@maharashtracity
मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून सुरु झालेल्या ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजनेतून गेल्या दिड महिन्यात अद्यापर्यंत १ कोटी ४ लाख ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असल्याचे सांगण्यात आले. यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून राज्य सरकारला ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session) पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत ज्येष्ठ नागरिक एसटी प्रवास योजना घोषणा केली. तर २५ ऑगस्टपासून ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा (travel through State Transport bus) लाभ घेतला होता.
आता १६ ऑक्टोबरपर्यंत योजनेतंर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची (Senior citizens) संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ एवढी झाली आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेमुळे जिल्ह्याच्या तसेच मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जाणे शक्य होत असल्याचे सांगण्यात येत आहे.