Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यात अनेक भागात डोळे येण्याची साथ सुरु असून या आजाराच्या रुग्णात वाढ होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. डोळे येणे मुख्यत्वे अडीनो वायरसमुळे होत असून हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे.
दरम्यान, राज्यात सध्या ४ लाख २० हजार १९३ डोळ्याच्या साथीचे रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा हजाराहून अधिक रुग्ण असलेल्या ठिकाणांमध्ये बुलढाणा ४४ हजार ९७४, पुणे ३५ हजार ३१२, जळगाव २६ हजार ६०४ असे सर्वाधिक रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात १३ ठिकाणी दहा हजारांहून अधिक रुग्ण असून २९ ठिकाणी चार अंकी रुग्ण आहेत. तर १५ ठिकाणी काहीशे मध्ये रुग्ण आहेत. तसेच तीन जिल्ह्यात दोन अंकी रुग्ण आहेत. डोळे येण्याच्या साथीविरोधात सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी घराघरात सर्वेक्षण सुरु असून आजाराच्या उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे की या आजाराचा संसर्ग एका व्यक्ती पासुन दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होत असल्याने नियमित हात धुणे, वैयक्तीक स्वच्ठता ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे परिसर स्वच्छ ठेवणे असे सुचविण्यात आले आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळयाला सूज येणे अशी लक्षणे असून हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तीक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हात धुणे, डोळयांना हात न लावणे असे काळजी घेण्यास सुचित करण्यात आले आहे. डोळे आलेल्या व्यक्तीने घरातच अलगीकरण करणे गरजेचे आहे.