@maharashtracity
धुळे: महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या (atrocities against women) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील साकी नाका (Saki Naka incident) परिसरात विवाहितेवर परप्रांतीयाने केलेला अत्याचार व त्यानंतर तिचा रुग्णालयात झालेला मृत्यू राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारा आहे. अशा अमानुष गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी, राज्यात तातडीने शक्ती कायदा लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या पाटील, आमिषा गावडे आदी उपस्थित होते.
याबाबत सोमवारी मनसेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की राज्यात गेल्या पाच दिवसांत महिलांवर अत्याचाराच्या चार घटना घडल्या. यातील अनेक घटना तर बदनामीच्या भीतीसह दहशतीमुळे उघडकीसही येत नाहीत.
राष्ट्रमाता जिजाऊ, राणी येसूबाई, ताराबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई यांच्यासारख्या अनेक थोर समाजसुधारक, विचारवंतांच्या या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शासनाने त्वरित शक्ती कायदा (Shakti Act) लागू करावा, साकी नाका परिसरात महिलेवरील अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast track court) खटला चालवावा.
आरोपीला कुठल्याही प्रकारची विशेष वागणूक देऊ नये, त्याला फाशीचीच शिक्षा द्यावी, पीडितेच्या परिवाराला शासनाने आर्थिक सहाय्य द्यावे, प्रत्येक महिला,युवतीला महाविद्यालयीन शिक्षणासोबत स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे करावे, अशा मागण्या मनसेने केल्या आहेत.