Twitter : @maharashtracity
मुंबई
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत निवेदनात केली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रक्कमेपैकी रुपये 10 लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये 10 लाख पाच वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित पाच लाख रुपये 10 वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मानव वन्य जीव संघर्षामध्येही वाढ होत आहे. हे संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधनही करण्यात येत आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.
मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते; याची दखल शासनाने या निर्णयामुळे घेतली आहे.
वनमंत्री म्हणाले, यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वन्यप्राणी हल्ल्यात कायम अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी खर्च देण्यात येईल. खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50 हजार प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात करावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात ते म्हणाले, सध्याच्या आर्थिक तरतूदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासन विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणी होत होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.
ते म्हणाले, वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात.