वैद्यकीय अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेकडून पदोन्नतीची मागणी
मुंबई: सरकारी आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी बीएएमएस यांच्यावर गेल्या २३ वर्षापासून अन्याय होत असून त्यांना एकही पदोन्नती देण्यात आलेली नाही. गट अ प्रदीर्घ प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले. तर कोविड कालावधीतील रुग्णसेवेत देशात पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र राज्याला आणण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या वैद्यकीय अधिकारी बीएएमएस यांच्या पदोन्नतीबाबत सरकारने दुर्लक्ष केले असून त्यांची उपेक्षा करण्यात आल्याची खंत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे गट अ तसेच गट ब संवर्गात प्रचंड असंतोष असल्याचे सांगण्यात आले.
या दोन्ही संवर्गातील पदोन्नतीची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या (covid pandemic) दोन वर्षात राज्याच्या आरोग्य विभागाने चांगली रुग्णसेवा दिल्याने देशातील पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचा उल्लेख आदराने केला. मात्र, रुग्णसेवेतील उत्कृष्टतेसाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी (BAMS Medical officers) दुर्लक्षितच राहिले. त्यांच्या पदोन्नतीबाबत (promotion) राज्य सरकारने गेल्या २३ वर्षापासून निष्क्रियता दाखवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता प्रतिक्षेची सीमा गाठली असून गट ब आणि गट अ मधील पदोन्नतीतील अन्याय दूर व्हावा, म्हणून पदोन्नतीची मागणी वैद्यकीय अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेकडून करण्यात येत आहे.