संभाजी राजेंनंतर राष्ट्रवादीचाही विरोध
By अनंत नलावडे
@maharashtracity
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वेडात मराठे वीर दौडले सात आणि हरहर महादेव हे दोन चित्रपट विरोधामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. माजी खासदार छ्त्रपती संभाजी राजे यांनी विरोध केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यात उडी घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आवाज असलेला छ्त्रपती हरहर महादेव तसेच महेश मांजरेकर निर्माते असलेला वेडात मराठे वीर दौडले सात या दोन चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप घेत छत्रपती संभाजी राजे यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेनेही हे चित्रपट जेथे लागतील त्या थिएटरचे पडदे फाडण्याचा इशारा दिला असतानाच सोमवारी राष्ट्रवादीनेही यात उडी घेतली आहे.
इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापीही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापीही सहन केली जाऊ शकत नाही. चित्रपट निर्मात्यांनीही चित्रपट तयार करत ना छत्रपती शिवाजी महाराजांशी सबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावित, कुठेही इतिहासाशी छेडछाड करू नये, अशा शब्दात पाटील यांनी बजावले आहे.
हर हर महादेव या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असून अक्षय कुमार तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका तसेच मांजरेकर यांचा पुत्र सत्या यांचा अभिनय असणारा वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे हे प्रत्यक्ष हजर होते. तर हर हर महादेव या चित्रपटाला राज ठाकरे यांचा आवाज आहे.