भाजप नगरसेविकेची मागणी

@maharashtracity

मुंबई: महिलांकडून मासिक पाळीच्या कालावधीत वापरण्यात येणारे ‘सॅनिटरी नॅपकिन’ (Sanitary Napkins) जनजागृती अभावी कचऱ्याच्या डब्यात, शौचालयात टाकण्यात येतात. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संस्था, सोसायटीमध्ये ‘ सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट मशीन’ बंधनकारक करण्यात यावे. तशी अट इमारतीची ‘ओसी’ देताना घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल (BJP Corporator Daksha Patel) यांनी केली आहे

महिलांना मासिक पाळी येणे ही नैसर्गिक बाब आहे. या मासिक पाळीच्या कालावधीत काही महिला आर्थिक परिस्थिती नसल्याने घरगुती कपड्यांचा वापर करतात. तर अनेक महिला, विशेषतः सोसायटी, गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणाऱ्या महिला बाजारात उपलब्ध ‘सॅनिटरी नॅपकिन’ चा वापर करतात. मात्र या ‘सॅनिटरी नॅपकिन’चा वापर केल्यावर त्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक महिला ते ‘सॅनिटरी नॅपकिन’ कचऱ्याच्या पेटीत टाकून देतात. कधी कधी ते नॅपकिन रस्त्याच्या कडेला टाकलेले आढळून येतात. त्यानंतर रस्त्यावरील अथवा कचरा पेटीतील कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचार्यांचा त्या ‘सॅनिटरी नॅपकिन’ शी संपर्क आल्यास त्यांना त्याद्वारे संसर्ग होण्याची शक्यता असते.

तसेच, ते नॅपकिन शौचालयात टाकल्यास शौचालये व टाक्या तुंबण्याची घटना घडतात. त्यामुळे ती शौचालये, शौचाच्या टाक्या साफसफाई करण्यात बराच वेळ निघून जातो. त्यासाठी काहि रक्कमही खर्च करावी लागते.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता, ‘सॅनिटरी नॅपकिन’ची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठीच नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संस्था, सोसायटीमध्ये ‘ सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट मशीन’ बंधनकारक करण्यात यावे. तशी अट इमारतीची ‘ओसी’ देताना घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here