Twitter: @maharashtracity
मुंबई: फिटनेसच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेल्या पिकल बॉल खेळाच्या प्रदर्शनी सामन्याचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे केले.
पिकल बॉल क्रीडा प्रकार सर्व शाळांमध्ये सुरु करावा या दृष्टीने आपण राज्याच्या क्रीडा मंत्र्यांना सूचना करु तसेच विद्यापीठ स्तरावर देखील पिकल बॉल खेळाला चालना देण्यासाठी कुलगुरुंना सूचित करू असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
कालांतराने या खेळाच्या माध्यमातून भारताने एशियन स्पर्धा तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशासाठी पदक प्राप्त करावे असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सादर केलेले खेळाचे प्रात्यक्षिक पाहिले व उपस्थितांशी संवाद साधला.
प्रदर्शनी सामन्याला ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभु, संस्थापक संचालक सुनील वालावलकर, महासचिव चेतन सनील, कोषाध्यक्ष निखिल मथूरे, महाराष्ट्र पिकल बॉल एसोसिएशनचे अध्यक्ष यशोधन देशमुख व मुंबई पिकल बॉल असोसिएशन चे अध्यक्ष अभिषेक सप्रे उपस्थित होते.
पिकल बॉल हा खेळ बॅडमिंटन, टेबल टेनिस व लॉन टेनिस यांचे मिश्रण आहे. आज ६० पेक्षा अधिक देशात पिकल बॉल खेळल्या जातो व कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला तो खेळता येतो असे ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी सांगितले.