@maharashtracity

महाड: महाड तालुक्यातील मौजे – राजिवली येथे कृषी विभागाच्यावतीने भात पिक शेतीशाळा rice (crop workshop) घेण्यात आली. या कार्यशाळा अंतर्गत पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये भाताची चारसूत्री पद्धतीने लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले.

भात पिकाची लावणी (cultivation of rice) चारसुत्री पद्धतीने कशी करावी याबाबत प्रत्यक्ष शेतावर दिनकर श्रीपत बुरटे यांनी भाताच्या पुजा गोल्ड या वाणाची चारसुत्री पद्धत वापरून लागवड केली. याकरिता चारसुत्री लागवड पद्धतीमधील हि चार सुत्रे वापरण्यात आली.

त्यामध्ये भाताच्या अवशेषांचा वखपर करणे, गिरीपुष्प पाल्याचा वापर, नियंत्रित लागवड, युरिया ब्रिकेट खताचा वापर या चार सुत्रांचा वापर करण्यात आला. त्यामुळे भात उत्पादनात पारंपारिक लागवड पद्धतीपेक्षा दीडपट ते दुप्पट उत्पन्न कसे वाढते याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देवून समजावण्यात आले.

हे प्रात्यक्षिक राबविण्याकरिता टी.पी.जगदाळे कृषि पर्यवेक्षक, नागाव, कृषी सहायक यु.एस.लेंगरे, नागाव यांनी माहिती व मार्गदर्शन केले.

यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी प्रथमत: रोपवाटिका तयार करण्यासाठी शेतातील माती चाळून घ्यावी लागते. एक हेक्टर क्षेत्राच्या रोपवाटिकेसाठी लागणारी माती चाळण्याचे काम एक मजूर एक दिवसात करतो. मॅट रोपवाटिका तयार करण्यासाठी प्लास्टिक ट्रे २७.५ X २१.५ सें.मी.चे २ याप्रमाणे ३०० ट्रे लागतात.

रोपवाटिका तयार करताना प्रथमतः ट्रे मातीने भरून घेऊन त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मातीत मिसळून त्याच्यावर एकसमान बियाणे पसरवावे लागते. त्यानंतर वरून चाळणीने मातीचा थर द्यावा लागतो. त्यावर भाताचा पेंडा झाकून सकाळ व संध्याकाळी फवारणी पंप च्या साहाय्याने पाणी द्यावे लागते, जेणेकरुन बी बाहेर पडणार नाही.

भात लावणी यंत्राद्वारे दोन मजूरांच्या सहाय्याने करता येते. एका दिवसात 4 रांगांच्या यंत्राद्वारे २ ते 3 हेक्टर क्षेत्रावर लावणी होवू शकते. भात लावणी यंत्र एका हंगामात ४० हेक्टर पर्यंत लावणीचे काम करु शकते. यासाठी पाच हजार रुपये पर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च येतो.

पारंपारिक पद्धतीने भात लावणी करावयाची झाल्यास हेक्टरी ३० मजूर लागतात. त्या तुलनेत यंत्राद्वारे केवळ २ मजूरांद्वारे भात लावणी होते. त्यामुळे मजूरी खर्चात ९० टक्के पर्यंत बचत होवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here