पाणीपुरवठा करताना पालिकेची कसरत
कोथूर्डे धरणाची पाणीपातळी घटली
२२ गावांनाही पाणीटंचाई
By मिलिंद माने
महाड: महाड शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शहराला पाणीटंचाईच्या (water scarcity) झळा बसु लागल्या आहेत. यामुळे शहरासह तालुक्यातील २२ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात अनेक भागात टँकरची (tankers) मागणी होत आहे. तर कोथूर्डे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या २२ गावात देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यावर्षी कोतुर्डे धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. शहराला प्रामुख्याने कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय कुर्ले धरण व एम.आय.डी.सी. येथूनही काही प्रमाणात शहरातील पुर्वेकडील व उत्तरेकडील भागात पाणापुरवठा होतो. या चारही ठिकाणाहून नगरपालिका शहराला दररोज ४० लाख लिटर्स पाणी पुरविते.
कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी छ. शिवाजी चौकातील मोठ्या टाकीत आणण्यात आले आहे. तेथून बहुतांशी भागाला पाणीपुरवठा होतो. कोतुर्डे धरणातील पाण्यावर महाडप्रमाणे या परिसरातील केंबुर्ली, दासगाव, वहूर, मोहोप्रे, गांधारपाले, लाडवली, नाते, खर्डी, चापगाव, तळोशी, नांदगाव खु, नांदगाव बु, करंजखोल, तेटघर, कोकरे, आचलोळी, इत्यादी गावांना देखील पाणीपुरवठा केला जातो. या २२ गावांना पाणीटंचाईची झळ बसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यावर्षी पाऊस मुबलक पडूनही धरणातील पाणी कमी झाल्याने शहरातील पाणीपुरवठा करताना पालिकेला पंप लावून पाणीउपसा करावा लागत आहे. ५ मे पासून धरणातील मृत पाणीसाठ्याला पंप लावून उपसा करून यातील पाणी नगरपालिका शहरात पुरवत आहे. यावर्षी पाणीसाठा लक्षात घेता पाऊस सुरु हाईपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा यासाठी पालिकेने पाणीकपात केली आहे. त्यामुळे आता शहरात एक दिवसाआड पाणी येत आहे.
महाड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. रहिवासी इमारती व व्यापारी पाणी वापर वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याची गरज भागत नसल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पूरामुळे तर उन्हाळ्यात टंचाईमुळे महाडकरांना पाणीपाणी करावे लागत आहे.
“या पाण्याने पिण्याची गरज भागत असली तरी वापरालाही मोठ्या प्रमाणाच पाणी लागत असल्याने काही नागरिक शहरातील विंधनविहिरीचा वापर करत आहेत. मोठ्या इमारतीमध्ये पाण्याचा टँकर विकत मागवावा लागत आहे .”
- दीपक पाटिल, स्थानिक रहिवासी
“महाड शहरात कोथूर्डे, एम आय डी सी, रानबाजीरे, कुर्ला या धरणातून पाणीपुरवठा होतो. कुर्ला धरणातून दादली येथे आणलेले पाणी प्रक्रिया करून शहरात आणले जाते. अशाच पद्धतीने कोथूर्डे धरणातून देखील आणलेले पाणी प्रक्रिया करून पुरवठा केला जातो. शहरात जवळपास २५,००० नळ जोडणी आहेत. कोथूर्डे वगळता कुर्ला धरणात अद्याप पाणी साठा बऱ्यापैकी असून शहरात पाणी पुरवठा करताना सर्वाना पाणी पुरेल अशा पद्धतीने नियोजन केले आहे .”
- रोहित भोईर, नपा पाणीपुरवठा अभियंता
“यावर्षी कोथूर्डे धरणातील पाणी रायगड रस्त्याच्या कामाला वापरले जात असल्याने धरणातील पाणी पातळी घटली आहे. यामुळे २२ गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. दासगावमध्ये ग्रामपंचायतमार्फत ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.”
- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगाव