वरंध आणि महाबळेश्वर घाट वाहतुकीस धोकादायकच

@maharashtracity

महाड: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला (Konkan) जोडणारे महाबळेश्वर आणि वरंधा असे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. गत पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता या वर्षी देखील डेंजर झोनमध्ये आहे. तब्बल एक वर्षाने घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) सुरवात केली असून या अजब कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

नुकतीच वरंध घाटात वाघजाई या ठिकाणी लघु स्वरूपातील दरड कोसळली होती. यामुळे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने हा घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara) आणि पुणे (Pune) या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर आणि वरंधा भोर घाटाची सन २०२१ मधील अतिवृष्टीत दयनीय अवस्था झाली होती. संपूर्ण घाटात दरडी कोसळून घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि वरंध घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता. या भेगा रस्त्यावर आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती.

वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकामाने काही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आलेल्या मार्गाची आजदेखील दुरवस्था आहे. ठिकठिकाणी महाड सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे सुरु असून मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.

वाघजाईजवळ असलेल्या दरडीत काम करणारा एक स्थानिक नागरिक जखमी झाल्यानंतर हा घाट १ जुलै ते ३० सप्टेंबर असा जवळपास तीन महिन्याकरीता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाड – वरंध – भोर – पुणे – पंढरपूर या घाटामुळे महाड आणि भोरमध्ये व्यापार आणि दळणवळण करणे सोपे झाले आहे. या मार्गावर असलेल्या घाटामुळे माझेरी, पारमाची पुढे भोर हद्दीतील शिलीम कुंड, राजीवडी, हिरडोशी, साळुंगण, उंबर्डेवाडी, शिरगाव या गावातील ग्रामस्थांना खरेदीसाठी बिरवाडी आणि महाडमध्ये येणे शक्य होते. भाजी विक्रेते, एस.टी बसेस, किरकोळ विक्रेते, पर्यटक याच मार्गाचा वापर करत आहेत.

घाटातील सौंदर्यदेखील ऐन पावसाळ्यात पाहण्याजोगे असते. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत गेली. मात्र दरवर्षी या घाटात सातत्याने दरडी कोसळत (landslide) असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. वरंधपासून भोरपर्यंत डोंगर भाग असल्याने मातीचा भाग कोसळून रस्त्यावर येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सतत खोदकाम करत कामे करत असल्याने माती खाली येण्याचे प्रमाण वाढत चालत आहे.

वरंध घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दरडी आणि माती हटवण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली आहे. यामध्ये संरक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नाले सफाई, आदींचा समावेश आहे.

पाऊस सुरु झाला असला तरी घाटात दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीची कामे केली जात आहेत. अवाढव्य स्वरूपात आलेल्या मातीच्या आणि दगडी दरडी पाहता सद्य स्थितीत बांधत असलेल्या सरंक्षक भिंती आणि गॅबियन भिंती किती तग धरतील याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here