संभाव्य पाणीटंचाईच्या भीतीने स्थानिक ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

@maharashtracity

महाड: किल्ले रायगड रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून ठप्प होते. सध्या या कामास पुन्हा सुरुवात झाली असून याकरता लागणारे पाणी गांधारी नदीतून उपसा करून घेतले जात आहे. या परिसरातील ज्या गावांना जॅकवेलच्या माध्यमातून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो, अशा ग्रामपंचायतींनी संभाव्य पाणीटंचाईच्या भीतीने पाणी उपसा करण्यास विरोध दर्शवला असून याबाबतचे निवेदन परिसरातील ग्रामपंचायतीनी प्रशासनाला दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji) राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad Fort) जाण्यासाठी लाखो शिवभक्त दरवर्षी येत असतात. महाडपासून रायगड रस्ता अरुंद आणि वळणदार असल्याने या मार्गावर कायम वाहतूक कोंडी (traffic congestion) होत असल्याने महाड – रायगड रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण शासनाकडून मंजूर करण्यात आले.

महाड – रायगड हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे (PWD) वर्ग करण्यात आला असून सिमेंट काँक्रीटच्या माध्यमातून दोन पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. याचे काम २०१९ पूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने हे काम अर्धवट अवस्थेत ठेवून पळ काढला होता. यामुळे या कामाची पुन्हा निविदा (tender) काढून संबंधित ठेकेदाराला बदलून नवीन ठेकेदार (contractor) नेमण्यात आला आहे.

कोरोना महामारी (corona pandemic) आटोक्यात आल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. याकरिता लागणारे पाणी गांधारी नदीतील जॅकवेल शेजारी उपसा करून टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला असून गांधारी नदीमधील पाणीसाठा कमी होत जाऊन जॅकवेल कोरड्या होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.

यामुळे पाणी उपसा तत्काळ बंद केला जावा अशी मागणी निवेदनाद्वारे दिली आहे.
महाड तालुक्यातील वाळसुरे, चापगाव, तळोशी, खर्डी, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, नाते, किंजलोळी बुद्रुक, गांधार पाले, साहिल नगर, वहूर, दासगाव व महाड शहर या गावांना कोथरूड धरणातील पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी महाड – रायगड रस्त्याचे काम करणारे ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन हे वापरत असल्याने दर दिवशी सुमारे एक लाख लिटर पाण्याचा वापर केला जातो आहे.

अजून सुमारे तीन महिने या पाण्याचा वापर केला जाणार आहे. भविष्यात वरील गावांना पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. भविष्यामध्ये गांधारी नदी कोरडी पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरील सर्वांकरिता पाणी आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी महाडचे तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी महाड पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद मांडवकर, वहूरचे सरपंच जितेंद्र बैकर, त्याचबरोबर नाते विभाग शिवसेनेचे बंधु तरडे, दासगावचे सरपंच दिलीप उकिर्डे यांनी महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांची भेट घेऊन वरील समस्या सांगितली व संबंधित ठेकेदाराला नदीतील पाणी वापरण्यास बंदी घालावी, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट केले.

“महाड – रायगड मार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने अद्याप जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेतलेली नाही. यामुळे गांधारी नदीतून पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल.”

  • रमेश चितळकर, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग महाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here