उशिरा पावसामुळे शेतकरी अडचणीत
शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न
भात पीकामध्ये देखील होणार घट
@maharashtracity
By मिलिंद माने
महाड: दर वर्षी कोकणातील शेतकऱ्यांसमोर पावसाचा प्रश्न कायमच असतो. यंदा देखील जून महिन्यात सुरू होणारा पाऊस जुलैमध्ये सुरू झाला. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात शेतीची १०० टक्के पूर्ण होणारी लागवड (cultivation of rice) (लावणी) अद्याप पन्नास टक्केही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात पिकाबरोबर येणाऱ्या काळात गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे.
दरवर्षी कोकणात जून महिन्याच्या सुरवातीलाच पाऊस सुरू होतो. यंदा मात्र जून महिन्यात तुरळक पाऊस पडला. कोकणात पावसाळी होणाऱ्या भात शेतीची पेरणी मे महिन्याच्या शेवटी केली जाते आणि पावसाळा सुरवात होताच जून २० पासून मोठ्या प्रमाणात लागवडीला (लावणीला) सुरवात होते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांची भात शेती लागवड होऊन पूर्ण होते. यंदा जुलै महिना अर्धा संपला तरी महाड तालुक्यातील ४० टक्के शेतीची लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुढे जरी चांगल्या प्रकारे पाऊस झाला तरी हातात पीकही येणार नाही अणि चाराह. उपलब्ध होणार नाही.
महाड तालुक्यात १८,५०० हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी पावसाळी भात शेती केली जाते. ही शेती पूर्ण जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. यंदा जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने महाडमध्ये पावसाला सुरवात झाली आणि नंतर भात लावणीला सुरवात झाली. आज ज्या ठिकाणी १०० टक्के भात लावणी पूर्ण होत असे अशा ठिकाणी फक्त ४० टक्के भात लागवड (लावणी) झाली आहे.
या पुढे लागवड कधी पूर्ण होणार आणि भात कापणी कोणत्या महिन्यात होणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
महाड तालुक्यात पावसाळ्यात होणारी भात शेती तीन टप्प्यातील असते. हळवी, निम हळवी आणि गर्वी. हळवी शेतीमध्ये भात उगवल्यापासून लागवड आणि कापणीपर्यंत ९० ते १२० दिवसाची कालावधी असतो. तर गर्वी शेतीसाठी १४५ दिवसाची कालावधी लागतो. मात्र, अजूनही महाड तालुक्यातील ६० टक्के शेती लागवडीस बाकी आहे. या शेतीची लागवड कधी होणार आणि कापणार कधी हा प्रश्न कायम आहे.
“पाऊस उशीरा सुरू झाल्यामुळे ज्या ठिकाणी ५० टक्के भात शेती लागवड पूर्ण झाली आहे, तिथे उशिरा लागवडीचा परिणाम भात पिकावर आणि गुरांच्या चाऱ्यावर होणार आहे.”
- बजरंग दाभेकर, कृषी सहाय्यक