@maharashtracity
देशपातळीवर पहिल्यांदाच महिलांची संख्या अधिक
मुंबई: देशाच्या शहरी भागात प्रजननाचा (birth rate) दर १.६ टक्के एवढा असून महाराष्ट्रात तो १.५ टक्के एवढा आहे. तर देशाच्या ग्रामीण भागात जनन दर २.१ टक्के इतका असून राज्यात तो १.९ टक्के एवढा आहे.
देशात २०१६-१५ या वर्षात जनन दर सरासरी प्रमाण २.२ टक्के एवढे होते. हे प्रमाण कमी होऊन यावर्षी २ टक्के एवढे झाले असल्याचे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey -NFHS) ५ व्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
राज्यात राबवल्या जाणाऱ्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा जाहिर केला. पहिला टप्पा डिसेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. भारतासह राज्यात राबवल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन (Family planning) कार्यक्रमाला यश मिळत असल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे.
दरम्यान, देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा वाढली असल्याचे दिसून येत आहे. १९९० च्या दशकात १००० पुरुषांच्या मागे ९२७ महिला होत्या. तर ताज्या अहवालानुसार, भारतात हजार पुरुषांच्या मागे १०२० महिला आहेत. मात्र महाराष्ट्रात २०१५-१६ या वर्षात १००० पुरुषांच्या मागे ९५२ महिला होत्या.
तर ताज्या अहवालानुसार, राज्यात हजार पुरुषांच्या मागे ९६६ महिला आहेत. तसेच राज्यातील शहरी भागात हजार पुरुषांच्या मागे ९५४ महिला आणि ग्रामीण भागात १००० पुरुषांच्या मागे ९७७ महिला सांगण्यात आल्या.