विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
@maharashtracity
By अनंत नलावडे
मुंबई: यंदा राज्यभरात अतिवृष्टी (heavy rain) आणि पूरस्थितीमुळे (flood) शेतीचे नुकसान झाले असून संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुध्दा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करा यासह शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (LoP Ajit Pawar) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांकडे सुध्दा पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत राज्यातील विविध प्रश्नासंबंधी चर्चाही केली. अतिवृष्टीमुळे स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, तरी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी, अशीही मागणी पवार यांनी केली.
कोल्हापूर (Kolhapur) व सांगली (Sangli) जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व आजपर्यंतच्या महापूर आणि अतिवृष्टी वेळची स्थिती पाहता अलमट्टी धरणाची (Almatti dam) उंची वाढविणे संयुक्तीक होणार नाही. तरी राज्य शासनाने याविषयी केंद्र सरकार व कर्नाटक सरकार यांच्याकडे पाठपुरावा करुन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविषयी प्रखर विरोध करावा, अशीही आग्रही मागणी पवार यांनी केली.
पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation – PMC) मागील ५ वर्षांमध्ये एकुण ३४ गावे समाविष्ट झाली आहेत. या गावामध्ये पायाभुत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ९ हजार कोटींच्या निधीची मागणी महानगरपालिकेने शासनास केली आहे. महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही पुरेसा निधी न मिळाल्याने ही गावे पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते, आरोग्य अशा मुलभुत सुविधांपासून वंचित राहिली असून यामुळे या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या गावांच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.