@maharashtracity
धुळे: स्थानिक गुन्हे अन्वेषण अर्थात एलसीबी शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत शहरातील एकता नगर व तालुक्यातील आर्वी येथून दोघांकडून दोन गावठी बंदूक व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात असून गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन पुतळ्याजवळ असलेल्या महाकाली टायर सर्व्हिस सेंटरचा मालक सचिन रघुनाथ मासाळ याच्याकडे एक गावठी बंदूक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जावून सचिन मासाळ याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गावठी बंदूक बाळगल्याची कबुली देत आपल्या एकता नगरमधील राहत्या घरातून 20 हजार रुपये किंमतीची गावठी बंदूक व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे पोलिसांच्या स्वाधीन केली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे तालुक्यातील आर्वी येथील संदीप अशोक चौधरीला गावातील सिताराम चौकातून ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक गावठी बंदूक व एक जिवंत काडतूस आढळले. या प्रकरणी दोघांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि दिलीप खेडकर, पोसई सुशात वळवी, योगेश राऊत, पोना कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, पोना महेश मराठे, विलास पाटील आदींनी केली.
अफूची विक्री करणार्यांना अटक
धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात अफूची तस्करी करण्यासाठी आलेल्या बलदेवसिंग चरणसिंग पन्नो रा.बडोदा, ह.मु.साक्री, रघुनाथ भोमा राठोड रा.सातपाडा ता.साक्री, ज्ञानेश्वर गोविंदा माळी रा.दहिवेल ता.साक्री व एक अल्पवयीन यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तर रमेश बागुल, चेतन पाटील व चेतनचा मित्र असे तिघे पळून गेले. त्यांचा पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांनी या ठिकाणाहून 36 हजार रुपयांचा 50 किलो सुकलेल्या अफूची बोंडे तसेच चार लाख रुपये किंमतीची एक मोटार व 40 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, आठ हजार रुपयांचे मोबाईल 14 हजारांची रोकड, असा एकूण 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.