महाड तालुक्यात वकीलांसह १० व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
@maharashtracity
महाड: भूसंपादनातून मिळणारा मोबदला लाटण्याच्या उद्देशाने मृत व्यक्ती जिवंत दाखवून तसेच बनावट दस्तऐवज तयार करून न्यायालयाची व सरकारी यंत्रणेची फसवणूक करणाऱ्या १० व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चार वकिलांचाही समावेश असल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महाड तालुक्यातील करंजाडी येथील ही घटना आहे. शासनाची आणि न्यायालयाची दिशाभूल केल्या प्रकरणी महाड न्यायालयाच्या आदेशानुसार तालुक्यातील करंजाडी येथील ६ जण आणि पनवेल येथील ४ वकिलांविरोधात ७/९/२०२२ रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११/२/२०१९ ते ७०/०९/२०२२ या कालावधीत मा. दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे घडली आहे.
महाड तालुक्यातील करंजाडी येथील मधुकर मिरगळ यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीनुसार आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये जयवंती मिरगळ, नथुराम मिरगळ, सुनील मिरगळ, अनिल मिरगळ, ज्ञानेश्वर मिरगळ, किशोर मिरगळ सर्व राहणार करंजाडी, त्याच प्रमाणे ॲड. भारत नवाळे, ॲड. रचना थाले, ॲड प्रिया परांगे व ॲड हेमंत भगत, सर्व राहणार पनवेल यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील आंबिवली येथे प्रस्तावित असलेल्या धरणाच्या कामाकरता मिरगळ कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन सन २००५ साली संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. हा मोबदला वाढवून मिळावा याकरता वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानुसार न्यायालयाने २०१७ मध्ये संबंधितांना एक कोटी ३५ लाख रुपये मोबदला दिला जावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाकडून २०१९ मध्ये याबाबतची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आलेली होती. ही रक्कम मिळावी यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून हा दस्तऐवज न्यायालयामध्ये सादर करण्यात आला. यामध्ये दगडू मिरगळ हे मृत झालेले असतानाही त्यांच्या जागी दुसरा माणूस उभा करून खोटे दस्तऐवज तयार करण्यात आले, त्या आधारे खोटे प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२२ ला या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये आय पी सी कलम १९३, १९६, १९९, २००, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करत आहेत.