@maharashtracity
धुळे: पुणे येथील साहित्यदिप प्रतिष्ठानच्या वतीने 2020 आणि 2021 या दोन वर्षाचे कलादीप पुरस्कार कोविडमुळे एकत्रच शनिवारी सकाळी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे (Aruna Dhere) यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका खान्देशकन्या अनुराधा मराठे आणि त्यांची कन्या गायिका अंजली मराठे (Classical Singer Anuradha Marathe & Anjali Marathe) यांना प्रदान करण्यात आला.
मायलेकीचा एकत्र सत्कार होण्याचा हा दुर्मिळ योग होता. यामुळे दोन स्वरदीप अधिक प्रकाशाने पुन्हा उजळून निघाले. समारंभाच्या अध्यक्षपदी पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्योत्तम हेमंत पेंडसे होते. व्यासपीठावर ‘साहित्यदिप’चे पदाधिकारी दिसत होते.
ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी अनुराधा मराठे यांच्या तंबोरा न घेता गायलेल्या सुंदर गाण्याचा आपल्यावर किती प्रभाव आहे हे सांगून, अनुराधा मराठे यांना लौकिक अर्थाने श्रीमंत होण्यापेक्षा रसिकांच्या प्रेमाने त्या अधिक श्रीमंत असल्याचे अरुणा ढेरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
साधी राहणी आणि कुठेही अहंभाव नसणार्या अनुराधा मराठे या आदर्श असल्याचे त्या म्हणाल्या. अंजली मराठे यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकून आपलाही चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून ठसा उमटविल्याचे ढेरे म्हणाल्या.
पुरस्काराला अनुराधा मराठे आणि अंजली मराठे यांनी यथोचित पण थोडक्यात उत्तर दिले. साहित्य परिषदेच्या सभागृहात ज्येष्ठ कवी रमण रणदिवे यांच्यासह मोजके साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अनुराधा मराठे यांच्याकडे शिकणार्या पल्लवी बापट, अश्विनी करंदीकर, नेहा देशपांडे आणि प्राची देवल यांनी काही गीते आणि बंदिश सादर केल्या.
कार्यक्रमाचा समारोप अंजली मराठे यांच्या गझल आणि दोघी चित्रपटात त्यांनी गायलेल्या ‘भुई भेगाळली खोल’ या गीताने झाला. राजू हसबनिस यांची तबला संगत आणि सचिन इंगळे यांची हार्मोनियमवरची साथ गायकांना अधिक उत्तम गाण्यासाठी साजेशी होती.
कोविडमुळे गेले दीड वर्षाने झालेल्या कार्यक्रमास जाता आले याचा आनंद साहित्यप्रेमी रसिकांना झाला.
साहित्यदिप प्रतिष्ठान, पुणेचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर व अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्रीमती अनुराधा मराठे (पूर्वाश्रमीच्या सविता नेने) या ख्यातनाम गायिका असून धुळे येथील कमलाबाई कन्या शाळा व विद्यावर्धिनी महाविद्यालय (Vidyavardhini College, Dhule) येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. धुळ्याचे संगीत तज्ज्ञ स्व. डॉ. बाळासाहेब श्रीपाद नाईक यांच्या त्या शिष्या आहेत.
इंटकचे (INTUC) कामगार नेते, स्वातंत्र्य सैनिक ‘युगसंदेश’चे संपादक स्व. आप्पासाहेब वि.वा. नेने यांच्या त्या कन्या असून अंजली ही त्यांची नात आहे. दोन्हीही मायलेकी अनेक पुरस्कारांच्या मानकरी असून दोन्ही मायलेकींना एकाच प्रतिष्ठेच्या पुरस्काराने एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्यात आल्याने खान्देशातून (Khandesh) अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.