उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Twitter: @maharashtracity

मुंबई: रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून केली असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाविरोधात पत्रकार शशिकांत वारीसे यांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण, सचिन आहेर, सुनील शिंदे, विलास पोतनीस, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

वारिसे हत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे कि, पत्रकार वारिसे यांची नाणार परिसरात ६ फेब्रुवारी रोजी जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. पत्रकार वारीसे यांनी वृत्तपत्रात आरोपी विरुद्ध बातमी दिलेली होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून उद्देश पूर्वक व जाणीवपूर्वक गाडीला ठोकर देऊन त्यांना जीव ठार मारले असल्याबाबत फिर्यादी यांनी पुरवणी जबाब दिल्यावरून या गुन्ह्यात कलम ३०२ समाविष्ट करण्यात आलेला आहे.

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येचा कट हा पूर्वनियोजित आहे किंवा कसे याबाबतचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी. ची स्थापना करण्यात आली असून, पुढील तपास एसआयटी मार्फत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here