@maharashtracity

मुंबई: ओपन सर्जरीला मागे टाकत एन्डोस्कोपी, रोबोटिक्स, थ्रीडी शस्त्रक्रिया सारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या शस्त्रक्रिया सध्या सहजतेने वापरल्या जात आहेत. अशा शस्त्रक्रियांमधील अद्ययावत ज्ञानाची देवाण घेवाण करणारी आंतरराष्ट्रीय परिषद पालिकेच्या लो. टिळक म्हणजे सायन रुग्णालयात( Sion Hospital) होणार आहे.

या परिषदेत देशविदेशातील वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन फीगो (FIGO) म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनोकॉलॉजी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष करणार असल्याची माहिती मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग संस्था अध्यक्ष डॉ. निरंजन चव्हाण (Dr Niranjan Chavan) यांनी दिली.

पालिकेच्या लोकमान्य टिळक म्हणजेच सायन रुग्णालयाचे सध्या अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने शस्त्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान हा विषय घेऊन या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान सायन रुग्णालयात २ व ३ सप्टेंबर रोजी दुर्बिणीतून शस्त्रक्रियेच्या कार्यशाळेचे तर ३ ते ४ सप्टेंबर रोजी वंधत्व शस्त्रक्रियेबाबत वांद्रे येथे आणि कर्करोग निवारणाबाबत शस्त्रक्रियांवर टाटा मेमोरियल (Tata Memorial) येथे वर्कशॉप होणार आहे.

विविध शस्त्रक्रियांमधील कौशल वाढविण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून अत्याधुनिक शस्त्रक्रियेतील तंत्र जशी दुर्बिणी, रोबोटिक, थ्रीडी सारख्या तंत्रांची सुक्ष्मता आणि आधुनिकता दाखविण्यात येणार आहेत.

यापूर्वी शस्त्रक्रिया ओपन म्हणजे खुल्या पद्धतीने करण्यात येत. मात्र जुन्या शस्त्रक्रिया पद्धतीमुळे रुग्णाला बरे होण्यास लागत असून तंत्रज्ञान अद्ययावत झाल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे. जगभरातील विकसित तंत्रज्ञान दाखविण्याचे या परिषदेचे उद्दीष्ट्य असल्याचे डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान सायन रुग्णालयातील कार्यशाळेत विविध पकारचे दुर्बिणीव्दारा करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया दाखविण्यात येणार आहेत. यात गर्भाशय काढणे, गाठी काढणे, गर्भाशयातील फायब्रॉईडची शस्त्रक्रिया, ट्युमर शस्त्रक्रिया, अंग बाहेर येणे यासारख्या उपचारावरील शस्त्रक्रियांचे थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहेत.

हे प्रक्षेपण भारताबाहेरील पाहीले जाणार आहे. शिवाय यात आंतरराष्ट्रीय फॅकल्टी सहभागी होणार असून एकूण २० फॅकल्टींचा सहभाग राहणार असल्याचे सांगण्यात आले. या तज्ज्ञ वक्त्यांमधील काही जण प्रत्यक्ष तर झुमवरुन सहभागी होणार आहेत. युरोप, स्पेन, इटली, युएस, न्युयॉर्क, ह्युस्टन येथील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्याचवेळी या परिषदेला बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ( Vidya Balan) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here