@maharashtracity

धुळे: महापालिकेच्या वतीने न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. दर सोमवारी व शुक्रवारी ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती महापौर चंद्रकांत सोनार यांनी यावेळी दिली.

बालकांना स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरियामुळे न्यूमोनिया हा आजार होतो. या आजाराचे प्रमाण पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये जास्त असते. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.

या आजाराची लक्षणे खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे हे आहे. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनाकडून महापालिकेेला न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस प्राप्त झाली आहे. ही लस मोफत देण्यात येईल.

लसीकरणाला मनपाच्या जुन्या सभागृहात माजी महापौर चंद्रकांत सोनार, महिला बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ.पल्लवी रवंदळे यांच्या उपस्थित प्रारंभ झाला.

तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या डोसचे २८ हजार ७५६ लाभार्थी आहे. ही लस ६ व १४ आठवड्याच्या बाळासह नऊ महिन्याच्या बालकांना देण्यात येणार आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात २ हजार ६०० डोस उपलब्ध झालेे आहेत. लसीकरणाला धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या रानमळा गावात प्रारंभ झाला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नूम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे उद्घाटन झाले. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीचा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना पुरवठा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here