Twitter: @maharashtracity

मुंबई: आरोग्य मंत्रालयाने लागू केलेली एकात्मिक औषध पद्धती म्हणजेच मिश्र पॅथी ही औषधाच्या सर्व प्रणालींचे मिश्रण दर्शवते. असे असले तरी यातून वैद्यकीय शिक्षणाची खिचडी सुरु झाली आहे. मिश्रपॅथीतील सराव हा लोक विरोधी असून मिश्रपॅथीला विरोध असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन सांगितले.

देशातील ६५० वैद्यकीय महाविद्यालयांमधून दरवर्षी ९९,०६३ एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडत असून डॉक्टरांचा तुटवडा दूर होईल असे असताना मिश्रपॅथीचा अट्टाहास का असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आला.

मिश्रपॅथीमुळे आधुनिक वैद्यक शास्त्रावर दुष्परिणाम होणार असून आयुर्वेद देखील नष्ट होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. मिश्रपॅथीसारख्या अवैज्ञानिक मिश्रणामुळे आरोग्य सेवेचा ऱ्हास होऊन देशातील आरोग्य सेवा शंभर वर्षे मागे जाणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे मिश्र पॅथी पद्धतीला विरोध करण्यात येणार असल्याचा असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.

यावर बोलताना आयएमएचे महासचिव जयेश लेले यांनी सांगितले की, भारतातील डॉक्टर कुशल असून जगातील इतर देशांमध्ये देखील ते सेवा देत आहेत. एकात्मिक औषध पद्धतीचा सराव फक्त चीनमध्ये केला जातो. मात्र यामुळे चिनमधील पारंपरिक औषध पद्धती नाहिशी होत आहे. आपल्याकडील पारंपारिक आयुर्वेदाची शुद्धता जपल्यास त्यात अधिक समृद्धता येऊ शकते. मात्र मिश्र पॅथी पद्धतीमुळे आयुर्वेदाचे अस्तित्व नाहिसे होण्याची शक्यता अधिक असल्याचे डॉ. लेले म्हणाले.

या अवैज्ञानिक मिश्रणामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था कमकुवत होण्याची शक्यता आयएमएकडून वर्तवण्यात आली. मिश्रपॅथी धोरण लोकविरोधी आहे. मिश्रपॅथीलच्या सरावाचा रुग्णांवर होणारा परिणाम अद्याप सामान्यांना समजून येत नाहीयं. मात्र भविष्यातील होणारे दुष्परिणाम लोकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही आयएमएकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here