पाच वर्षांच्या प्रतिक्षेला यश
मुंबई: औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत येणाऱ्या कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने अनेकदा वेदना भोगावे लागल्या. मात्र, आता कामगार रुग्णालय सुरु होणार असून पाच वर्षांच्या प्रतिक्षेला यश आले आहे. १४ ऑगस्ट या दिवशी या रुग्णालयाच्या ओपीडीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोबत इतर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती रुग्णमित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते भीमेश मुथुला यांनी दिली.
दरम्यान, अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालय २०१८ पासून बंद असून आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालय तातडीने सुरु करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी रुग्णालय बंद असल्याची बाब मान्य करून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हे रुग्णालय ऑगस्टपर्यंत पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेत दिली.
केंद्र सरकारच्या अधिनस्थ राज्य विमा निगम महामंडळानेही इमारत दुरुस्तीसाठी रिकामी केली आहे. या रुग्णालयाचे दुरुस्तीचे काम मे. एनबीसीसी या कंपनीला दिले आहे. या रुग्णालयातील इतर सेवा तात्पुरत्या स्वरूपात कांदिवली कामगार रुग्णालयात हलवण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाच्या अग्नीसुरक्षेसाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा केला जात होता. हे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत ओपीडी सुरु होणार आहे.
हे कामगार रुग्णालय सुरु करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणारे समाजिक कार्यकर्ते भीमेश मुथुला यांनी सांगितले की, गेली पाच वर्षे हे ३९० बेड्सचे रुग्णालय बंद होते. याचे एक आणखी एक केंद्र कांदिवलीमध्ये आहे. कामगारांचा ताण आणखी वाढल्यावर या रुग्णालयाची कमतरता जाणवू लागली होती. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये प्रतिक्षा यादी आहे. त्यामुळे, अनेक बैठकांच्या सत्रानंतर आता अखेर हे रुग्णालय सुरु होत आहे.
आता सुरक्षेसंबंधित परवाने मिळाले आहेत. पाठपुराव्यानंतर हा विषय मार्गी लावायला सांगितला होता. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ओपीडी, दुसऱ्या टप्प्यात ऍडमिशन घेतले जातील आणि तिसऱ्या टप्प्यात पूर्ण रुग्णालय सुरु होणार असल्याचे भीमेश मुथूला म्हणाले.