@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अखेर विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. मात्र, गेल्या ४८ तासांत शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सर्वच मंडळात दमदार पाऊस झालेला आहे. तालुक्यातील सात पैकी चार मंडळांत ४८ तासात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊन अतिवृष्टी (heavy rain) झाली आहे.
शिरपूर तालुक्यात यावर्षी जूनपासूनच चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. जुलै महिन्यात काही दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. यात काही मंडळात १७ ऑगस्टपूर्वी जेमतेम सरासरी १०० मिलिमीटर पाऊस झालेला होता. त्यामुळे तालुक्यात सर्वदूर पावसाची आवश्यकता होती.
बागायती पिके काही प्रमाणात तग धरून होती. मात्र कोरडवाहू पिके कधीची वाया गेलेली आहेत. त्यामुळे निदान रब्बी हंगामात तरी फायदा होईल. यामुळे तालुक्यात पावसाची प्रतीक्षा होती. १७ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपासून तालुक्यात पाऊस झालेला आहे.
सर्वात जास्त पाऊस शिरपूर मंडळात जवळपास तब्बल ९४ मिलिमीटर एवढा झालेला होता. तर सांगवी मंडळात सर्वात कमी ४० मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. शिरपूर, थाळनेर व बोराडी या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. नाल्यांना पाणी आले आहे.