Twitter: @maharashtracity
मुंबई: खारघर येथे आज झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी जमलेल्या पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी ( Padmshri Dr Appasaheb Dharmadhikari) यांना मानणाऱ्या सुमारे सहा लाख श्री सदस्यांच्या समुदायातील काही अनुयायांचा उष्माघाताने मृत्यू (death caused due to heat wave) झाला असून किमान पाचशे लोक उष्माघाताने अत्यवस्थ आहेत. या सर्वांवर कामोठे येथे एम जी एम तसेच नवी मुंबईतील टाटा रुग्णालय आणि डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सरकारी पातळीवरून याबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे. विशेष म्हणजे उष्माघात आणि तापमानावर रोज बोलणारे अधिकारी आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंध असलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी फोन उचलणे बंद केले आहे, माहिती देणे बंद केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांच्या हस्ते आज खारघर येथे पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजकीय गणिते लक्षात घेऊन आणि आप्पासाहेब यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या अनुयायांचा पुढील निवडणुकीत राजकीय फायदा (political benifit) करून घेण्यासाठी सुमारे वीस लाख श्री सदस्यांचा समुदाय जमवण्याचे नियोजन होते. आजच्या कार्यक्रमाला सुमारे सहा लाख श्री सदस्य उपस्थित होते, अशी चर्चा आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबईत अप्पासाहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला किमान तीस विधान सभा मतदारसंघात थेट फायदा होईल, असे म्हटले जाते. राज्यात उष्माघाताची लाट असतानाही हा कार्यक्रम भर दुपारी घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत देखील प्रारंभी अत्यंत ढिसाळपणा दिसून आला. एका सनदी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एवढा मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन असताना आणि हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाचा असताना सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हात वर केले होते. हा आमचा कार्यक्रम असून मुख्यमंत्री कार्यालयाचा असल्याचे सांगून सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाच्या नियोजनाकडे पाठ फिरवली होती, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
कार्यक्रमासाठी लागणारा वीजपुरवठा मिळावा यासाठी साधा अर्ज देखील करण्यात आला नव्हता. मात्र महावितरणने स्वतःहून पुढाकार घेत वीज व्यवस्था उभारून दिली. आदल्या दिवशी रात्री येणारे श्री सदस्य, दुसऱ्या दिवशी जमणारे श्री सदस्य यांचे जेवण, आणि पाण्याची, शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत अत्यंत ढिलाई सुरू होती. अखेर मुख्यमंत्री यांचे विश्वासू सचिन जोशी यांच्यावर नियोजनाबाबत आढावा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सचिन जोशी यांनी दोन दिवसापूर्वी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून नियोजनाची मीटिंग घेतली होती. जोशी यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी रायगड जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, सिडको प्रशासन, पनवेल महानगरपालिका यांच्यावर सोपवून त्यांना कामाचे वाटप केले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर कामाला गती प्राप्त झाली होती.
असे असतानाही भर दुपारी कार्यक्रम झाल्यामुळे अनेक लोकांना उष्णतेमुळे भोवळ आली. त्यात काही अनुयायांचा मृत्यू झाले आहेत, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र नेमका आकडा किती याबाबत त्याने मौन बाळगले.
दुर्घटनेतील मृतांचे खरे आकडे समोर आले तर त्याचे खापर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फुटण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पातळीवरून ही बातमी दाबण्याचे आणि कुठलेही आकडा बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते. एकही सनदी अधिकारी किंवा या कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंधित कुठलाही अधिकारी फोन घेण्यास तयार नाही आणि किंवा बोलण्यास तयार नाही.
मृतांच्या आकड्यांबद्दल संधिग्दता आहे. ८, 11, 16 की आणखी किती मृत्यू झाले याबाबत कुठलीही नेमकी खातरजमा होऊ शकलेली नाही.
११ श्री सदस्यांचा मृत्यू
रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम हॉस्पिटलला भेट देऊन मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांचे संत्वान केले. उष्माघातामुळे अकरा श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतरीत्या सांगण्यात आले. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्यात येतील तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन उचलणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. या घटनेने आपल्याला दुःख झाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.