@maharashtracity
आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचा इशारा
जानेवारीच्या तिसर्या आठवड्यातच कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबई: राज्यात सध्याचा कोरोना (corona) संसर्गाचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसर्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील काळात जर कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या ८० लाखांवर पोहोचल्यास तसेच मृत्यूदर १ टक्के राहिल्यास कोरोनामुळे ८० हजार मृत्यू होण्याचा अंदाज आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr Pradeep Vyas) यांनी वर्तविला आहे.
त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करा व राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना डॉ. प्रदीप व्यास यांनी पालिका आयुक्त व जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, डॉ. प्रदीप व्यास यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ यांना पत्र लिहून कोरोनाच्या आगामी पसरणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या गंभीर स्थितीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना दिल्या.
यात लसीकरण न झालेल्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता वैज्ञानिकदृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्यात अद्यापही ज्यांचे लसीकरण (vaccination) पूर्ण झाले नाही तसेच ज्यांच्यामध्ये सहव्याधी आहेत अशा लोकांची संख्या अधिक असल्याने येणारी लाट त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तिसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढणार आहे. अशावेळी ८० लाखांची रुग्णसंख्या धरली तरी १ टक्का मृत्यूदराप्रमाणे ८० हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज प्रदीप व्यास यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात आजही डेल्टाची (Delta variant) रुग्णसंख्या ७० टक्के असून प्रत्येक जिल्ह्यात हे प्रमाण वेगवेगळे आहे.
ओमिक्रोन (Omicron) सौम्य असल्याचे दिसून आले तरीही हा समाजात मिसळू नये यासाठी काटेकोरपणे लक्ष देण्यास सूचित करण्यात आले आहे. तर कोरोना कॉल सेंटर्स (call centers) तत्पर ठेऊन लोकांमध्ये जनजागृती करा.
ऑक्सिजन सॅच्युरेशन, ६ मिनिटांची चालण्याची चाचणी यांचेही मार्गदर्शन या कॉलसेंटरवरून व्हायला हवेत. तसेच रुग्णाला अॅडमिट होण्यासाठी कोरोना रुग्णांची माहिती पुरवण्याबरोबरच ही कॉल सेंटर अॅम्बुलन्स नेटवर्कसोबत (Ambulance network) जोडण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.