‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित‘ अभियानात सार्वजनिक आरोग्य विभागाची कामगिरी
@maharashtracity
मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने नवरात्रौत्सवापासून सुरु झालेल्या राज्याच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या ’माता सुरक्षित तर घर सुरक्षित‘ या अभियानात राज्यातील एक कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी वीस दिवसांच्या कालावधीत झाली.
राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह शहरातील वस्त्यांमध्येही आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचा एक कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतरर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. आतापर्यंत एकूण १,२९,५७,०४५ महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
या आढाव्यात राज्यातील अतिदुर्गम, आदिवासी पाडे, तांडा वस्तीसह खेड्यातील महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. महिलांना त्यांच्या गावातून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत वाहनातून ने-आण करण्याची सुविधा आहे. आशाताई, अंगणवाडी सेविकांच्या साहाय्याने या मोहिमेचा प्रतिसाद वाढला आहे. शिवाय, शेवटच्या महिलेची तपासणी होईपर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे असे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
आरोग्य विभागाबरोबरच, आदिवासी विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, ग्रामीण विकास विभाग,सामाजिक न्याय विभाग, वैदयकिय शिक्षण विभाग या विभागांचा सहभाग घेउन जास्तीत जास्त माताभगिंनीची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ठ ठरवले असल्याचे सांगितले.
दरम्यान, या मोहिमेतून आतापर्यंत एकूण १,२९,५७,०४५ महिलांची तपासणी करण्यात आली. ३० वर्षांवरील १,०८,३३० महिलांना मधुमेह तर १,८३,२०६ महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे प्राथमिक निदानातून आढळून आले. एकूण ११,७७,८८५ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२,८९४ मातांना उच्च रक्तदाब आढळून आला. तीव्र रक्तक्षय असलेल्या २१,८५६ मातांना आयर्न सुक्रोज देण्यात आले. १,११,५७४ मातांची सोनाग्राफी करण्यात आली. तर तीस वषावरील १२,८९४ महिलांना हृदयासंबंधित आजार असल्याचे आढळून आले तर २१,५४५ लाभार्थ्यांना कर्करोगाची संशयित लक्षणे आढळून आले.
तसेच ३०११८९० लाभार्थ्यांना मानसिक आरोग्य, तंबाखू सेवन करु नये याबाबत समुपदेशन करण्यात आले. राज्यातील साडेतीन कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करावयाची असून यात विविध आजाराशी संबंधित १४ पेक्षा जास्त चाचण्या करण्यात येणार असून सर्व चाचण्या विनामूल्य करण्यात येणार आहेत. तसेच तपासणी शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे/महिलांचे समुपदेशन करुन त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे असेही सावंत यांनी सांगितले.