श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
@maharashtracity
भाईंदर: सफाई कामगारांना देखील कायम सेवेत असलेल्या कामगारांना मिळणाऱ्या लाभांप्रमाणे सर्व लाभ देणारी मिरा भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
आजचा दिवस फक्त मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांसाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील कंत्राटी सफाई कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कंत्राटी सफाई कामगारांना कायद्याने विहित केलेले किमान वेतन (Minimum Wages), बोनस (Bonus), प्रॉव्हिडंट फंड (PF) सुट्टीचा पगार, ई एस आय सी (ESIC) यांच्यासह आता ग्रॅज्युएटीदेखील (Gratuity) मिरा भाइंदर महानगरपालिकेने देण्यास सुरुवात केली आहे.
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या उपस्थितीत आज महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले (Municipal Commissioner Dilip Dhole) यांनी सेवानिवृत्त कामगाराला ग्रॅज्युटीचा (उपदान) धनादेश देऊन सुरुवात केली.
राज्यात कंत्राटी सफाई कामगारांसाठी कायद्याने मिळणारे जे जे लाभ आहेत.उदा-किमान वेतन, बोनस,सुट्टीचा पगार पि.एफ, ई.एस.आय.सी. हे सर्व ठिकाणी दिले जात नाहीत. तसेच कामगार जेव्हा सेवानिवृत्त होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेला त्यांनी केलेल्या सेवाकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना जे उपदान (ग्रेज्युईटी) दिली जाते ते फक्त कायम स्वरुपी कामगारांना आतापर्यंत दिली जात होती. परंतू कंत्राटी सफाई कामगारांना ग्रेज्युईटी दिली जात नाही.
श्रमजीवी कामगार संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून कामगाराला ग्रेजुईटी देऊन सुरुवात करण्यात आली. आयुक्त दिलिप ढोले यांच्या हस्ते निवृत्त कंत्राटी सफाई कामगार कमलाकर जनार्दन म्हात्रे यांना ग्रेजुईटी (उपदान) चा धनादेश देण्यात आला. एकूण १८० सेवानिवृत्त कामगारांना ग्रेजुईटीचा लाभ देण्यात आला.
येथील कंत्राटी कामगारांच्या चांगल्या कामामुळेच स्वच्छते बद्दल चा ‘स्वच्छ भारत अभियान पुरस्कार’ मीरा भाईंदर महानगर पालिकेला दोन वेळा मिळालेला आहे.