राज्यपाल कोश्यारी यांचे अमित शहांना पत्र

By अनंत नलावडे

By अनंत नलावडे

महापुरूषांचा अनादर करण्याची कल्पना आपण स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तबगार व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरूषांचा अवमान नव्हे, असा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक मोठे लोक आपल्या घरातून बाहेर पडत नव्हते,  तेव्हा मी या वयातही शिवनेरी, सिंहगड, रायगड, सिंदखेडराजा अशा स्थळांना भेटी दिल्याचे सांगत कोश्यारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता टोलाही लगावला.

राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांचा तीव्र निषेध केला आहे. महाविकास आघाडीच्यावतीने येत्या १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तर १९ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांचा मुद्दा गाजणार आहे. या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणारे पत्र गृहमंत्री शहा यांना लिहिले आहे. मात्र, पत्रावर तारीख ६ डिसेंबर २०२२ अशी तारीख आहे.

ते नमूद करतात की, त्यांच्या भाषणातील छोटासा अंश काढून काही लोकांनी त्याचे भांडवल केले. “मी शिकत होतो तेव्हा सर्व विद्यार्थी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू या सगळयांना आदर्श मानत होते. मात्र तरुण पिढी वर्तमानातील आदर्शही शोधत असते. म्हणूनच मी म्हणालो की डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी हे देखील आदर्श असू शकतात. आज जगभरात देशाचा लौकिक वाढविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तरूणांचा आदर्श असू शकतात. याचा अर्थ महापुरूषांचा अवमान करणे असा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तर ते महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचेच लौकिक आहेत. मोगल काळातील त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असणारे महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरूषांच्या अवमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असेही कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात अनेक महनीय व्यक्ती आपल्या घरातूनही बाहेर पडत नव्हत्या. तेव्हा मी या वयातही शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र ठिकाणांचे जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजालाही मी गेलो. गेल्या ३० वर्षांत या ठिकाणी जाणारा मी पहिलाच राज्यपाल असेन. मला राजकारणापासून दूर रहायचे होते. मात्र पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह यामुळे मी महाराष्ट्राचे राज्यपाल पद स्वीकारले. माझ्याकडून अनावधानाने जर कधी चूक झालीच तर तत्काळ खेद व्यक्त करायला किंवा क्षमायाचना करायला मी कधीच संकोच करत नाही. आपणच आता यासंदर्भात उचित मार्गदर्शन करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here