मनपा कर्मचार्यांचे आयुक्तांना साकडे
धुळे: महानगर पालिकेतील अधिकारी, कर्मचार्यांच्या विविध न्याय्य मागण्यांबाबत प्रशासनाने नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी. पात्र गुणवत्ताधारक कर्मचार्यांना न्याय द्यावा, अन्य संघटनांच्या तक्रारींची दखल घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी मनपातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिले.
याबाबत मनपा अधिकारी, कर्मचार्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक राहीले आहे. सातवा वेतन आयोग, कालबध्द पदोन्नती, मुन्सिपल फंडातील कर्मचार्यांना कायम करणे, हद्दवाढ व रोजंदारी कर्मचार्यांचे प्रश्न, रोजंदारी कर्मचार्यांची दरवाढ व नियमित पगार या सर्व बाबी प्रशासनाच्या सकारात्मकतेमुळेच झाल्या आहेत.
सद्यस्थितीत मनपातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पात्रतेनुसार व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव प्राशसनामार्फत कार्यान्वित झाला आहे. त्यावर त्वरीत कार्यवाही होवून पात्र व गुणवत्ताधारक अधिकारी, कर्मचार्यांना प्रशासन न्याय देईल, अशी अपेक्षा आहे.
तथापि, प्रशासनाच्या या सकारात्मक कार्यवाहीत नवीनच निर्माण झालेली कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही संघटना वारंवार जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. या संघटनेत मनपाचे मोजकेच कर्मचारी असून अन्य सर्व बाहेरील व्यक्ती आहेत. प्रशासनाविरोधात सातत्याने अनाठायी तक्रारी करुन अधिकार्यांवर दबाब आणण्याचा व बदनामी करण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत सुरु आहे.
या संघटनेशी धुळे मनपाच्या अधिकारी व कर्मचार्यांचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्याही तक्रारीची, अर्जाची दखल घेऊ नये.
प्रशासनाने आपल्या नियमानुसार पात्र व गुणवत्ताधारक कर्मचार्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रभारी नगरसचिव मनोज वाघ आदींनी केली आहे.