अग्निशमन दलाच्या अधिकारी – जवानांचा सन्मान
By Sachin Unhalekar
Twitter: @Rav2Sachin
मुंबई: महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील १३ अधिकाऱ्यांना व जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके’ प्रदान करण्यात आले. तसेच राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान देऊन निधी संकलन मोहिमेचा ही शुभारंभ केला.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाच्या उदघाटन प्रसंगी सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखाला अग्निशमन सेवा चिन्ह लावले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यशवंत जाधव, माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी कैलाश हिवराळे, माजी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी विजयकुमार पाणीगृह, प्रमुख अग्निशामक सुरेश पाटील आणि संजय म्हामुनणकर तसेच राज्य अग्निशमन सेवेतील अधिकारी व जवानांना प्रदान करण्यात आले.
दरम्यान, नागपूर येथील नॅशनल फायर सर्विस कॉलेजमध्ये येत्या १७ एप्रिल २०२३ रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रपतींचे शौर्य पदक अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
फोर्ट परिसरात भानुशाली इमारती कोसळली आणि या दुर्घटनेत शौर्य कामगिरी करणारे मुंबई अग्निशमन दलाचे माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी आत्माराम मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी के. आर. यादव यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक बहाल केले जाणार आहे.
तसेच कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळती दुर्घटनेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे शौर्य पदक विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगांवकर, केंद्र अधिकारी सागर खोपडे, वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल विश्वासराव, केंद्र अधिकारी दीपक जाधव, प्रमुख अग्निशामक संजय गायकवाड आणि अग्निशामक गणेश चौधरी, संजय निकम यांना प्रदान केले जाणार आहे.