@maharashtracity
धुळे: धुळे जिल्ह्यातील पांझरा व कान नदीवरील पांझरा मध्यम प्रकल्प, जामखेडी मध्यम प्रकल्प व विरखेल लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत जामखेडी प्रकल्पातून १ हजार १८५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पांझरा प्रकल्प नुकताच पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून नदी पात्रात विसर्गात वाढ होईल.
मालनगाव प्रकल्प सद्य:स्थितीत ९५ टक्के भरला असून कोणत्याही क्षणी सांडव्यावरून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यातच मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेता प्रकल्पाच्या आणि पांझरा व कान नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.
विसर्गामुळे पूर परिस्थिती उद्भवू नये आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने पांझरा तसेच कान नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच नदी पात्रात कोणत्याही नागरिकाने उतरू नये किंवा जनावरे नेऊ नयेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे यांनी केले आहे.