@maharashtracity

मनसेसह शिवसेनेची मागणी

डेंग्यूने धुळ्यात बालकाचा मृत्यू

धुळ: शहरात डेंग्यू (Dengue), मलेरियासारख्या (Malaria) साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. बुधवारी डेंग्यूमुळे सहा वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. साथ नियंत्रणात आणण्यात मनपा प्रशसानाला सपशेल अपयश आले. या पार्श्‍वभूमीवर या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोग्य अधिकार्‍यासह संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह (MNS) शिवसेनेने (Shiv Sena) केली आहे.

यासंदर्भात मनसेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले. तर शिवसेनेने माध्यमांना प्रसिध्दी पत्रक दिले. त्या उभय संघटनांनी म्हटले आहे की, शहरात डेंग्यू, चिकनगुनिया व इतर साथीचे आजार बळावले असतांना आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म बसली आहे. सहा वर्षाच्या वेद सूर्यवंशी याचा डेंग्युमुळे मृत्यू झाला, याला जबाबदार प्रशासनच आहे.

शहरातील अनेक भागात गरज असतांना देखील मनपाने कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी, जंतूनाशक फवारणी नियोजन आखून प्रभावीपणे केलेली नाही. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेले आहे.

शिवसेनेने दिलेल्या पत्रकात गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, साथीच्या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी मनपाने १४ ते१५ कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. त्यातील २ कोटी रुपयांचे बीलही दिले गेले आहे. कर्मचारी केवळ कागदावरच काम करीत आहेत. धुळे शहरातील नागरिकांचा जीव जात असताना सत्ताधारी नगरसेवक दमन येथे हॉटेलांमध्ये मजा करीत आहेत.

धुळे महानगर पालिकेतील (DMC) सत्ताधार्‍यांना कुठलेच सोयरसुतक नाही. शिवाय, आरोग्य विभागाने साथीचे आजार रोखण्यासाठी कुठल्याच प्रकारची उपाययोजना केलेली दिसून येत नाही. मनपा डेग्युंवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे निष्पाप मुलाला जीव गमवावा लागला.

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बळी गेलेल्या निरपराध बालकाच्या मृत्युला जबाबदार असणार्‍या अकार्यक्षम आरोग्य अधिकारी इतर जबाबदार व्यक्ती यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे हर्षल परदेशी, अनिल शिरसाठ, विठ्ठल पगारे तर शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here