@maharashtracity

धुळे: शासकीय जागेवर अतिक्रमण करणे धुळे तालुक्यातील सौंदाणे येथील महिला सरपंच व एका सदस्याला भोवले. दोघांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अपात्र ठरवण्याची कारवाई केली आहे. (Sarpanch disqualified due to encroachment on govt land)

सौंदाणे ग्रामपंचायतीची निवडणूक २०१८ मध्ये झाली. निवडणुकीत कमलबाई अमृत पाटील या सरपंच म्हणून तर भीमराव माणिक पाटील हे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्याविरुद्ध चंद्रशेखर पाटील यांनी तक्रार केली होती.

सरपंच कमलबाई पाटील यांचे सासरे सदा पाटील यांच्या नावावर सिटी सर्व्हे क्रमांक २८५ ही जागा होती. त्याशेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीची सिटी सर्व्हे क्रमांक २८४ ही जागा आहे. या जागेत असलेल्या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होत होता.

मात्र, विहिरीचा वापर कमी झाल्याने सरपंच कमलबाई पाटील, पती अमृत पाटील यांनी विहीर बुजवून शासकीय जागा ताब्यात घेतली. त्याला सरपंचांचे समर्थन होते. तसेच या जागेचा वापर सरपंच व त्यांचे कुटुंबीय करत असल्याची तक्रार चंद्रशेखर पाटील यांनी केली होती.

सदस्य भीमराव पाटील यांनी निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात भावाच्या नावावरील इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये राहत असल्याची माहिती दिली होती. ही इमारत शासकीय जागेवर व लेआऊटमध्ये नाल्याच्या जागेवर असल्याचे तक्रारीत नमूद होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी तक्रारदार चंद्रशेेखर पाटील यांची तक्रार अंशत: मान्य करून सरपंच कमलबाई पाटील व सदस्य भीमराव पाटील यांना उर्वरित काळासाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिला.

तक्रारदारातर्फे ऍड. समीर पंडित, ऍड. अविनाश शिंदे तर सरपंच, सदस्यांकडून ऍड. एल. पी. ठाकूर, ऍड. शीतल बोरसे यांनी काम पाहिलेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here