@maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयांतील (TB hospital) परिचारिकांसह सर्व कर्मचारी आज ठिय्या आंदोलन करणार आहेत. साप्ताहिक सुटी, पदोन्नती कालबद्ध पदोन्नती अशांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहायक सचिव प्रदिप नारकर यांनी सांगितले.
या ठिय्या आंदोलनात (protest) सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी परिचारिकांचे प्रश्न, अडचणी मांडण्यात येणार आहेत. यावर बोलताना नारकर यांनी सांगितले की, ८ जून रोजी पालिका उपआयुक्तांसोबत तर ६ एप्रिल रोजी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली होती. यावेळी घेतलेल्या निर्णयाची तसेच निर्णयाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास प्रशासन असमर्थ ठरले असल्याने हे ठिय्या आंदोलन घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्व मनपा सर्वसाधारण रुग्णालये जसे केईएम, नायर, सायन रुग्णालयातील परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना महीन्याला आठ साप्ताहिक सुट्टी दिल्या जातात. याच धर्तीवर क्षयरोग रुग्णालयातील परिचारिका यांना देखील सुटी देण्यात याव्यात. तसेच कालबद्ध पदोन्नती देण्यास हलगर्जीपणा होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रोजंदारी कामगारांना दिला जात असलेला मानसिक त्रास, केली जात असलेली पिळवणूक दूर करून न्याय देण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.