Frankfort (Indiana)

By डॉ. संगीता तोडमल

@maharashtracity

डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत (USA) ऑनलाइन पद्धतीत आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे (International Yoga Day) औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये योगा करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे.

मूळच्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील असलेल्या डॉ संगीता तोडमल पर्यावरण अभ्यासक असून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन म्हणजेच (I N O) तथा संयुक्त आयुष मंत्रालय प्रतिनिधी म्हणूनअमेरिकेत काम करतात. डॉ संगीता या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अमेरीका अध्यक्ष आहेत. या माध्यमातून त्या अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.

पुणे येथील पद्मश्री शीतल महाजन स्काय डायव्हर हिने नऊवारी साडी घालून तेरा हजार फुटांवरून उडी मारण्याचा थायलंडमध्ये विक्रम केला होता. तसेच बारामतीमधील लता करे यांनी बारामती मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन चप्पल न घालता नऊवारीसाडीमध्ये धावल्या होत्या.

पूर्वीच्या काळीही महिला नऊवारी साडीमध्ये झिम्मा फुगडी नागपंचमीचे फेर आणि भोंडला असे विविध कार्यक्रम करत असत. या सर्वांचा आदर्श घेत देश – परदेश कुठेही असो, आपली महाराष्ट्राची नऊवारी काही कमी नाही. डॉक्टर संगीता तोडमल यांनी अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करून दाखवून दिले आहे. यामध्ये जगातल्या अनेक देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या समारंभाची मुख्य संकल्पना सुजाता पाटील आणि डॉक्टर यश पाटील यांची होती. तसेच मुख्य मार्गदर्शक अनंत बिराजदार हे होते.

जगामध्ये जेव्हा अनेक राज्यातील संस्कृती आपापलं वेगळेपण दाखवत असतात, त्यात महाराष्ट्र कुठेही कमी नाही. महाराष्ट्राची नऊवारी म्हणजे एक संस्कृती आहे हे आता जगात सिद्ध झाले आहे. अनेक जण महाराष्ट्र सोडून परदेशात गेले असले तरी आपली वेशभूषा जपत आहेत. प्रत्येक महिला आपली नऊवारी घेऊन सोबत महाराष्ट्रीयन अलंकाराचा साजही चढवत आहेत.

मराठी नारी डॉक्टर, इंजिनीअर आणि शास्त्रज्ञ म्हणून देश विदेशात काम करतात. मराठी माणसांचे वेगळेपण म्हणजे देश-विदेशात जाऊनही आपली पिठलं भाकरी आणि पुरणपोळी विसरले नाहीत. आपली भारतीय आहार पद्धती आयुर्वेदिक शास्त्रानुसार बनवलेली असून प्रत्येक पदार्थांमध्ये जीवन सत्वाबरोबर रुची संपन्नता ही जपलेली आहे, हे आज जगाने अनुभवलेले आहे.

डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जपत भारतीय भाज्यांची परसबाग ही जपलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि ऑरगॅनिक फार्मिंग करून स्वतःच्या पालेभाज्या आणि फळभाज्या स्वतः पिकवतात. एकूणच सातासमुद्रापलिकडे ही आपली संस्कृती वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करतात.

आज जागतिक स्तरावर योगाचे वर्ग आणि भारतीय योग प्रशिक्षकांना वाढती मागणी याचा विचार करता जगाला भारतीय योगाचे महत्व कळलेले दिसते. प्रगत देशातही योगाला मोठ्या प्रमाणात स्वीकारलेले दिसते. आजच्या दगदगीच्या आणि आधुनिक जीवनपद्धतीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रणालीच्या जगात योगच जगाला सावरू शकेल.

आज कोरोनासारख्या महामारीने सर्व जग थांबले आहे. त्यामुळे घरातच बसून ऑनलाइन योगा करण्याची वेळ आलेली आहे. एक प्रकारचे नैराश्य जगात पसरत असताना योगाच्या माध्यमातून लोकांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम योगाद्वारे होत आहे.

अन्न आणि आरोग्य प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. भाज्यांमध्ये केमिकलची फवारणी करणे आरोग्यास हानिकारक आहे. त्या गेले अनेक वर्षे अमेरिकेत रासायनिकमुक्त भाज्यांची लागवड करत आहेत. त्याचबरोबर आयुर्वेद आणि औषधी वनस्पती तुळस गवती चहा यांचाही प्रचार आणि प्रसिद्धी करत आहेत.

या आंतरराष्ट्रीय योगदिन समारंभाच्या कार्यक्रमात किरण पवार, नेदरलँड यांनी मार्गदर्शन केले. नाशिक योग विद्यापीठाची डिग्री संपादन केलेली आहे. तसेच सुनिता रिकामे ढोले, गंधर्व अकादमी संचालक यांनी सिंगापूरमधून मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी मोतीलाल राठोड, शर्मिला ब्राह्मणे, भाग्यश्री कोते- सस्ते, माधुरी सिनारे, श्वेता कोल्हापुरे, किरण बोरसे, निलेश इंगुळकर, गिरिश साळवे, आरती साळवे यांनी विशेष सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here