उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
Twitter : @maharashtracity
पालघर: पालघर जिल्ह्यातील माहिम येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर माहीम येथील पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी 11 जणांनी बलात्कार केल्याचे आज १८ डिसेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना पत्र देऊन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोपी तरूणांपैकी अनेक तरूण हे गर्दच्या (नशेचा पदार्थ) आहारी गेल्याचे निदर्शनास आलेले आहे.
या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून 11 पैकी 5 जणांना अटक झाली असून 6 आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्यामुळे डॉ.गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनास पुढीलप्रमाणे सुचना दिल्या आहेत.
1. या घटनेच्या सर्व संबंधित आरोपींस लवकरात लवकर अटक करण्यात यावी.
2. घटनेचा तपास जलद गतीने करण्यात यावा.
3. घडलेल्या घटनेतील आरोपींना जामीन मिळणार नाही या दृष्टीने योग्य कार्यवाहीची आवश्यकता आहे. तसेच घटनेचा तपास जलदगतीने करण्यात येण्याची आवश्यकता, घडलेल्या घटनेतील आरोपींना जामीन मिळणार नाही यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता, घटनेतील अल्वयीन मुलीना समुपदेशन तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.