जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संजय विसावे यांचे आवाहन
@maharashtracity
धुळे: कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आलेला असतानाच पालघर व ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची अफवा पसरल्यामुळे पुन्हा एकदा पोल्ट्री व्यवसायावर संकट कोसळले आहे. परंतू, धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. चिकन, अंडी शरीरासाठी पोष्टिक व पोषक असल्याने आहारामध्ये त्यांचा समावेश करावा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन धुळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संजय विसावे केले आहे.
कोरोना विषाणूच्या अफवांमुळे ग्राहकांनी चिकन अंडी खाणे कमी केल्यामुळे विक्रीत मोठी घट झाली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. मात्र, शरीरासाठी पौष्टिक आहार म्हणून चिकन व अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर पोल्ट्री व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली होती.
सध्या ठाणे व पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. असे असले तरी त्या रोगावर मात करण्यास प्रशासनाला यश आले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू, नये यासाठी वेळीच प्रशासनाने काळजी घेत उपयोजना केल्या आहेत. तसेच जिल्ह्यात वेळोवेळी पथकाच्या माध्यमातून पक्ष्यांचे नमुने, सर्वेक्षण केले जात आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकसह इतर कुठल्याही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नसून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू, नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.संजय विसावे यांनी केले आहे.