७२ गावातील २१ हजार १०१ नागरिकांचे अजूनही स्थलांतर नाही
Twitter : @milindmane70
महाड
महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर भाग असून तालुक्याचा ग्रामीण भाग डोंगराच्या पायथ्याशी आणि दऱ्या खोऱ्यात वसलेला आहे. २००५ मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने शेकडो लोकांना जीव गमवावे लागले होते. तेव्हा पासून गेली 18 वर्ष पावसाळ्यात दरडीचा धोका महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील गावे व वाड्यांना कायम आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी महाड तालुक्यातील दरडग्रस्त गावांसाठी खबरदारी घेतली जाते. गेल्या वर्षी देखील तालुक्याला पर्जन्यवृष्टीचा फटका बसला. या वर्षी देखील बसण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून म्हणुन ७२ गावातील २१ हजार १०१ नागरिकांना दरड प्रवण क्षेत्रामधून भूस्खलन होण्याच्या शक्यतेने स्थलांतरित करावे लागणार असली तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही कोणत्याही दरडग्रस्त गावातील नागरिकांना स्थलांतरित केलेले नाही.
महाड तालुक्यातील बहुतांशी गावे ही दुर्गम व डोंगराळ भागात तीव्र उताराच्या जागेवर आहेत. तर कांही गावे डोंगराला लागूनच पायथ्याशी वसलेली आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. अतिवृष्टीने जमिनीवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक बदल होतात तर काही ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे भूपृष्ठावर बदल झालेले आहेत.
महाड तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त गावातील नागरिकांना व प्रशासनाला देखील येत्या पावसाळ्यात नैसर्गिक आव्हानाचा सामना करावा लागणार आहे, मात्र शासनाकडे संभाव्य दरडग्रस्त भागात भूस्खलन होईल किंवा तो भाग पावसाच्या पाण्यामुळे खचेल अशी पूर्व चेतावणी किंवा संकेत देणारी यंत्रणा विकसित नाही. त्यामुळे दुर्गम व डोंगराळ भागात अतिवृष्टी कशाप्रकारे होते, यावरच सर्व अनुमान असल्याने दरडप्रवणग्रस्त भागातील नागरिकांचा जीव वेशीला टांगला असल्याचे चित्र या भागातील गावांमध्ये फेरफटका मारल्यावर पाहण्यास मिळाले.
स्थलांतरित करावे लागणार असलेल्या गावांची नावे व त्यांची लोकसंख्या पुढील प्रमाणे:
लोअर तुडील नामावले कोंड ३०६, शिंगरकोंड मोरेवाडी २०३, आंबिवली पातेरीवाडी ९३, कोंडीवते मूळ गावठाण २०१, मुठवली ३१५, सोनघर २२५, जुई बुद्रुक ३५०, चांडवे खुर्द ६२०, सव ७०५, रोहन १५९, वलंग ५२७, कोथेरी जंगमवाडी १०५, माझेरी ७८८, पारमाची वाडी २५५, कुंबळे ५६९, कोसबी १९८, वामने ४९८, चिंबावे बौद्धवाडी ४२१, वराठी बौद्धवाडी २९६, चोचिंदे ११६४, गोठे बुद्रुक ७०५, आदिस्ते ३७०, खैरे तर्फे तुडील २४२, कुर्ला दंड वाडी ८५, रावतळी मानेचीधार १७१, मोहोत सुतारवाडी २६३, मांडले ३२, पिंपळकोंड ४५०, मुमुर्शी आंब्याचा कोंड १५६, मुमुर्शी गावठाण २९४, मुमुर्शी बौद्धवाडी २७६, वीर गाव व वीर मराठवाडी ४४, टोल बुद्रुक १२६०, दासगाव भोईवाडा १४५०, तळोशी ४३०, बिरवाडी वेरखोले ४५०, करंजखोल ५४०, नडगाव काळभैरव नगर २८५, पुनाडेवाडी १९, पाचाडवाडी २४, सांदोशी हेटकर कोंड १८०, शेलटोळी २६५, अंबेशिवथर १७५, वाळण बुद्रुक २२०, पाचाड हिरकणी वाडी ५४५, पाचाड परडी वाडी २२, वाघेरी आदिवासी वाडी १९८, तांदळेकर वाडी २३५, करंजाडी म्हस्के कोंड ९५ , नातोंडी धारेची वाडी ८०, गोंडाळ कडवेवाडी १३३, खर्डी ३५५, पांगारी मनवे धार ४०, वरंध पोकळे वाडी ६१४, वरंध ५३, आड्राई ४३, वाळण झोळीचा कोंड ८७, वाळण केतकीचा कोंड ४५५, बिवघर २८१, पिंपळवाडी शेडगेवाडी ४६५, रुपवली बौद्धवाडी ५९, निगडे खोतवाडी १२५, बारसगाव १६१, कोठेरी मूळ गावठाण ८५, ओवळे १९, खरवली बौद्धवाडी ९८, अशा ७२ गावातील ५ हजार ५३८ कुटुंबांमधील एकवीस हजार एकशे एक नागरिकांना निवारा शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करावे लागणार आहे.
महाड तालुक्यात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने भूस्खलन होणाऱ्या गावांमधील ४ गावे पहिल्या वर्गात, ५ गावे दुसऱ्या वर्गात तर ३७ गावे तिसऱ्या वर्गात तर एक गाव चौथ्या वर्गात समाविष्ट केले आहे. एकंदरीत स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या गावांची संख्या कमी असली तरी मागील वर्षापेक्षा यावर्षी अतिवृष्टी होण्याची शक्यता जास्त असल्याने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने सूचना केल्याप्रमाणे संभाव्य दरडग्रस्त गावांचे स्थलांतर करावे लागणार आहे.
महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता व प्रशासनाची कागदावरील तयारी बघता प्रत्यक्षात अतिवृष्टीग्रस्त व दरडप्रवण क्षेत्रात पोहोचण्यासाठी प्रशासनाला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण मागील वर्षी झालेल्या दरड प्रवणग्रस्त भागात ज्या प्रमाणात कामे करणे आवश्यक होते, ती आज देखील पूर्ण झालेली नाहीत. त्याच बरोबर दरड प्रवणग्रस्त भागामध्ये ज्या तलाठी व ग्रामसेवक यांची नियुक्त केलेली आहे, प्रत्यक्षात त्यांच्याकडे तीन ते चार गावांचा कार्यभार असल्याने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात व प्रत्यक्षात कृती घडल्यावर काय करावे व काय करू नये, याबाबत तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून राहून त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मागील 18 वर्षात महाड आणि पोलादपूरमध्ये दरडी, भूस्खलन आणि पुराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शासकीय पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. प्रतिवर्षी येणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर अभ्यास करत बदल केला जात असून यावर्षी देखील प्रशासन गत वर्षाचा अनुभव लक्षात घेवून उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. पावसाळा सुरु झाला असून दरडी आणि पुराची शक्यता लक्षात घेवून स्थानिक नागरिकांना स्थलांतर करणे, स्थलांतर करण्यासाठी निवारा व्यवस्था, शहरात पूर परीस्थिती उद्भवल्यास लागणारी बचाव यंत्रणा, संपर्क साधनांची उपाययोजना, बोटींची व्यवस्था, आदीची तयारी प्रशासनाकडे असली तरी दरडग्रस्त भागात कधी भूस्खलन होईल, त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत
महाडमध्ये एन.डी.आर.एफ. चे बोलावण्यात आले पथक
महाड व पोलादपूर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात अतिवृष्टी झाल्यामुळे ऐन पूर परिस्थितीत दूरध्वनी यंत्रणा कोलमडते, अशा वेळी मोबाईल यंत्रणा देखील काम करत नाही. याकरिता वॉकी टॉकी व्यवस्था उपलब्ध केली आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास अर्ली वार्निंग सिस्टम देखील अवलंबली जाणार आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नव्याने दाखल झालेले प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली.
महाड तालुक्यात 188 गावे असून पूरग्रस्त गावे 35 व दरडग्रस्त गावे 72 आहेत. यापैकी 48 गावांमधील निवारा शेडच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून या जागांची सुरक्षिततेच्या कारणास्तव भुगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे राज्य शासन दरडग्रस्त गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याबाबत उपाययोजना करताना दिसत आहे. त्यासाठी निवारा शेड व अन्य उपाययोजना करीत असताना दुसरीकडे दरडग्रस्त गावातील व वाड्यांवरील स्थलांतर करण्यात येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर कोट्यावधी रुपये रस्ते, पाणी व शाळा तसेच वीज यंत्रणा सक्षम करणे या गोष्टींवर खर्च करीत आहे. त्यामुळे नक्की दरडग्रस्त गावांच्या स्थलांतर करण्यात येणाऱ्या जागेवर खर्च करणे अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणच्या सुविधांवर खर्च करणे अपेक्षित आहे, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे, याबाबत राज्य शासनाने निश्चित धोरण आखणे गरजेचे आहे.