हिरे शासकीय रुग्णालयाचा परिसर तीन तासात कचरामुक्त
धुळे: सर्वांना स्वच्छतेचे महत्व कळावे याकरीता स्वच्छता पंधरवडाचे निमीत्त साधून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतः हातात झाडू घेत अधिकार्यांसोबत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविली (cleaning drive under Swachh Bharat Mission). यावेळी हिरे रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Govt Medical College) आणि सर्वोपचार रुग्णालय (civil hospital) हे धुळे (Dhule) जिल्ह्यासह शेजारील नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) परिसरातील रुग्णांसाठी औषधोपचार करून घेण्याचे हक्काचे ठिकाण आहे. या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यासह स्थानिक नागरिक उपचारासाठी येत असतात. परंतू, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य हेाते. यामुळे दुर्गधी आणि अस्वच्छता निर्माण झाल्याच्या तक्रारी होत्या. परिणामी, शुक्रवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतः पुढाकार घेत हाता झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबविली.
त्यांच्यासोबत या अभियानात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, हेमांगी पाटील, सुरेखा चव्हाण, डॉ.श्रीकुमार चिंचकर, अधिष्ठाता डॉ.अरुण मोरे, डॉ.दीपक शेजवळ, डॉ.मुकरम खान, डॉ.अमिता रानडे, डॉ.राजेश सुभेदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.ए.तडवी, महानगर पालिका उपायुक्त डॉ.संगीता नांदुरकर यांच्यासह हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आ.मंजूळा गावीत, जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावीत, महानगर प्रमुख सतीष महाले यांच्यासह कार्यकर्त्यांनीही स्वच्छता केली. तब्बल तीन तास ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानंतर संपूर्ण परिसर हा कचरामुक्त आणि चकाचक झाला.
“जीवनात स्वच्छता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपले आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहीजे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचे महत्व काळेव याकरीता हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आगामी काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही स्वच्छता राखावी.”
- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे.