जिल्हाधिकारी जलज शर्मांच्या सूचना

@maharashtracity

धुळे: तृतीयपंथीय (Transgender) व्यक्तींच्या रहिवासासाठी जमीन मागणीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सादर करावा. त्यावर महसूल विभागाने तातडीने कार्यवाही करावी, शिवाय, तृतीयपंथीयांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा (IAS Jalaj Sharma) यांनी दिल्या.

जिल्ह्यातील तृतीयपंथियांच्या समस्या, तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली. या बैठकीत अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम.एम.बागुल, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, अशासकीय सदस्य पार्वती जोगी, सचिन शेवतकर, अ‍ॅड.विनोद बोरसे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, केंद्र सरकारने तृतीयपंथीय व्यक्तींसाठी ’नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ (National Portal for Transgender Persons) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी नाव नोंदणी करावी. या नोंदणीच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे अभिप्रेत आहे. त्यासाठी समाजकल्याण विभाग व तृतीयपंथीयांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

तृतीयपंथीय व्यक्तींच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय (civil hospital)आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Govt Medical College) व सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. तेथे तृतीयपंथीय व्यक्ती दाखल झाल्यावर त्याच्यावर आवश्यक सर्व ते उपचार करण्यात यावेत. नागरी व ग्रामीण भागात स्वतंत्र स्वच्छता गृहे बांधावीत.

किमान कौशल्य विकास कार्यक्रमातून (Skill Development) शेळीपालनासाठी तृतीयपंथीयांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे संबंधितांना तातडीने प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे. याशिवाय बाह्य स्त्रोतांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांनी तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी केल्या.

तृतीयपंथियांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून तृतीयपंथियांचे स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने सर्वेक्षण, नोंदणी करणे, विहित नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करून देणे, शिधापत्रिकेसाठी मदत करणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मोहीम राबविणे, आरोग्य शिबिर, स्वयंरोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पार्वती जोगी, शेवतकर, अ‍ॅड.बोरसे आदींनी सहभाग घेत विविध सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here