@maharashtracity
कोरोना महामारीतून मुक्तता व पाऊस पडू देण्याचे साकडे
धुळे: जिल्ह्यात कानुमातेचा (Kanu Mata) उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सोमवारी सकाळी शहरातील विविध भागातून वाजत-गाजत मिरवणूक काढून कानुमातेला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीतून (corona pandemic) सर्वांना मुक्त कर व खान्देशासह (Khandesh) धुळ्यात (Dhule) मुसळधार पाऊस पडू दे, असे साकडे भाविकांनी कानूमातेला घातले.
दरवर्षी कानबाई अर्थात कानूमातेचा उत्सव (Festival of Kanbai) संपूर्ण खानदेशात उत्साहात साजरा केला जातो. खान्देशात होऊन गेलेल्या कण्हेर राजाची पत्नी म्हणून पुराणात तिचा उल्लेख सापडतो. कानबाई एक दिवसासाठी आपल्या माहेरी येते, माहेरी आल्यावर तिचा साग्रसंगीत सन्मान करून तिचा महिमा गायला जातो, अशी आख्यायिका सांगितली जाते.
याच कानूमातेची रविवारी घरोघरी विधिवत स्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्ताने बाहेरगावी असलेले सर्व नातेवाईक एकत्रित येतात. कानुमातेच्या दर्शनासाठी घरोघरी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री अनेकांनी अहिराणी गीते (Ahirani folk songs) म्हणून जागरण केले. महिला पुरुषांनी पारंपारिक गीते आणि वाद्यावर फुगड्यांचा फेर धरला.
सोमवारी आरती केल्यानंतर वाद्यांच्या तालावर कानुमातेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आबाल वृद्धांनी ठेका धरला. मिरवणुकीदरम्यान महिलांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
कानुबाई उत्सवाची विसर्जन मिरवणुकीमुळे मुख्य रस्ते, बाजारपेठ गर्दीने फुलली होती. प्रमुख चौकात मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी गर्दी केली होती. कानुबाईची पूजा करून पूजेचे साहित्य नदीपात्रात सोडण्यात आले. ग्रामीण भागातही सकाळपासून कानुबाईच्या मिरवणुका उत्साहात काढण्यात आल्या.