@maharashtracity
मुंबई: मुंबईमध्ये अद्यापही कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव सुरू असताना मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने हटवादी भूमिका घेऊन मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक आदी पदांसाठी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत पालिकेतील विविध कामगार संघटनांनी (Labour union) या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
जर प्रशासनाने हट्टाला पेटून या परीक्षा जबरदस्तीने घेतल्या तर कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल व त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पालिका प्रशासनच कारणीभूत असेल, असा इशारा कामगार नेते बाबा कदम व रमाकांत बने यांनी प्रशासनाला दिला आहे.
या संदर्भातील मागणीचे एक निवेदन महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल चहल यांना दिले आहे.
याप्रसंगी, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे नेते बाबा कदम, दि म्युनिसिपल युनियनचे नेते व सर चिटणीस रमाकांत बने, हिंदुस्थान कर्मचारी संघाचे नेते दिवाकर दळवी, म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव, श्री. खान, श्री. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई महापालिका प्रशासनाने, कोरोनाची तमा न बाळगता लिपिकीय संवर्गासाठी मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक, वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक या पदाकरिता ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली असून या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात याव्यात.
मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक, वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक या पदांच्या कालपद पदोन्नतीसाठी लिपिकीय संवर्गासाठी असलेली खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची असलेली अट शिथिल करून त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी कामगार नेते बाबा कदम, रमाकांत बने यांनी सर्व कामगार संघटनांच्या वतीने केली आहे.