@maharashtracity
पोलीस अधिकार्यांच्या घरांमध्ये शिरले पाणी
सखल भागात साचले तळे
धुळे: धुळे शहर (Dhule) आणि जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसाने (heavy rain) शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला (Panzara river) पूर आला. शहरातील अग्रवाल नगर, ८० फुटी रोड या परिसरातील सखल भागात पाणी साचले. या भागातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले. जिल्हा पोलिस मुख्यालयासह पोलिसांच्या घरात पाणी शिरले. दरम्यान, या पावसामुळे खरिपाची पिके (Kharif crop) हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अतिवृष्टी, मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. या पावसामुळे शहरातील विविध भाग जलमय झाले आहेत. शहरातील सुरत बायपास रोडवरील चितोड चौफुलीवरील उड्डाण पुलालगतचा सर्व्हिस रोडही पावसामुळे वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक शहरातील जुन्या साक्रीरोडने वळविण्यात आली. दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासांत धुळे जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
सोमवार रात्रीपासून धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील काही महसुली मंडळांत तर ५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सायंकाळपासून रात्रभर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.
यामुळे प्रथमच जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पाणी आले. शहरांत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून जणू तळी निर्माण झाली होती. बुधवारी प्रथमच पांझरा नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ती दुथडी वाहत होती.
धुळे शहरात मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर सुरूच होता. पहाटे त्यांनी विश्रांती घेतली. दरम्यान रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांत तळे साचल्याचे चित्र निर्माण झाले होते.
यात शहरातील मौलवीगंज, ८० फुटी रोड, तिरंगा चौक, वडजाईरोड, अग्रवालनगर, तसेच झाशी राणी पुतळा, पोलीस अधिकारी वसाहत, पोलीस अधीक्षक कार्यालय आवार आदी भागांत ठिकठिकाणी मोठे तळे साचले होते.
नाल्याकाठच्या घरांतही काही ठिकाणी पाणी शिरल्याने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. अग्रवाल नगरमधील वसाहतींत अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी वाहत होते. ८० फुटी रस्त्यावरील तिरंगा चौक परिसरातील रस्त्यावरून वाहणारे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. या रस्त्याने जाताना नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्गस्थ व्हावे लागत होते.
शहरातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातही मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. यामुळे कार्यालयात येणार्या पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना कार्यालयात जातानाही अडचणींचा सामना करावा लागला.
शहरातील भाईजीनगर परिसरातील प्रवीण अग्रवाल यांच्या निवासस्थानाजवळ रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विजेच्या तारेसह झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या वीजतारांचा धक्का लागल्याने एक गाय मृत्युमुखी पडल्याचे समजते. वीजतारा तुटल्याने रस्ताही बंद झाला होता. तसेच परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.
या पावसामुळे शिरपूर, साक्री, दोंडाईचा, शिंदखेडा आदी शहरांतील उंच-सखल भागांतही ठिकठिकाणी पाणी साचल्याने जणू या भागांना तळ्याचे स्वरूप आले होते.
जिल्ह्यात सर्वदूर मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती शिवारातही पाणी साचले होते. यामुळे धुळे तालुक्यातील अंचाळे शिवारातील शेतकर्यांच्या कपाशी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, ज्वारी, मका आदी पिकेही पाण्याखाली गेली. यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधीच पावसाने ओढ दिल्याने कशीबशी जगविलेली खरिपाच्या पिकांत आता पाणी साचल्याने या पिकांवर रोगासह विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
“मंगळवारी रात्री साडेबारा वाजेपासून पावसाचे पाणी घरात शिरले आहे. आम्ही आमच्या इलेक्ट्रीक मोटारीने हे पाणी उपसण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतू, घराच्या मागे असलेल्या गटारी पुर्ण तंबलेल्या आहेत. त्या गटारीचे पाणी घरात येत आहे. अद्यापही घरात पाणी आहे तसेच आहे.'”
–हेमंत पाटील,
पोलीस निरीक्षक, धुळे