आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची घोषणा
By Khanduraj Gaikwad
Twitter : @KhandurajG
मुंबई: राज्यातील आदिवासी समाजाची कला, संस्कृती, वेशभूषाअशा वैविध्यपूर्ण परंपरा जतन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आता पुढाकार घेतला आहे. आता नागपूर, नाशिक येथे भव्य असे अत्याधुनिक म्युझियम, तर आठ आदिवासी बहुल जिल्ह्यात एक हजार क्षमतेचे तर तालुका स्तरावर पाचशे क्षमता असलेले आधुनिक सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. याबाबत प्रारूप आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली.
आदिवासी जमाती मुख्यत्वेकरून डोंगराळ प्रदेशात राहतात, त्यांचे निसर्गाशी नाते घट असते. हा समाज निसर्गाची पूजा करतो. त्यांची सर्व संस्कृती, व्यवसाय उद्योग, पारंपरिक शेती,कला-लोकसंस्कृती या निसर्गाशी निगडीत आहेत. महाराष्ट्रात ४५ आदिवासी जमातीची नोंद आहे. प्रत्येक भागातील आदिवासी जमातीची कला संस्कृती वेगवेगळी असते. त्यांच्या या पारंपरिक संस्कृतीची ओळख जगाला व्हावी, म्हणून यासाठी खास अत्याधुनिक म्युझियम होण्याची गरज राज्य सरकारला वाटली. म्हणूनच नागपूर आणि नाशिक येथे दोन भव्यदिव्य असे नवीन सांस्कृतिक आणि अत्याधुनिक म्युझियम उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या म्युझियममध्ये सुमारे दीड हजार क्षमतेचे आसन व्यवस्था असणारा वातानुकूलित अँडोटेरियम, ग्रंथालय,आदिवासी जमातीची वाद्य, शेतीची संबंधीत हत्यारे-औजारे, वनापासून तयार करण्यात येणारे उत्पादन वस्तू, कला-संस्कृतीच्या दृष्टीने वेशभूषाने नटलेले पुतळे, वारली चित्रकलेच्या प्रदर्शनासाठी विविध दालने, आदिवासी विभागाचे कार्यालय, पाहुण्यांसाठी निवास व्यवस्था असणारे गेस्ट हाऊस, या सुविधांचा समावेश राहणार आहे. नागपूर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणीच्या भव्य म्युझियम उभारण्यासाठी सुमारे एकूण चारशे कोटी रुपये अंदाजित खर्च लागण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.
त्याच प्रमाणे नंदुरबार, धुळे, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, पालघर,आणि ठाणे या जिल्ह्यात याच धर्तीवर एक हजार क्षमतेचे आसन व्यवस्था असणारे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. साधारणपणे हे प्रत्येक सांस्कृतिक भवन बांधण्याकरिता वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याभागातील आदिवासी संस्कृतीचा उगम, त्यांचा इतिहास जतन करणारे कला महोत्स, प्रदर्शन या सांस्कृतिक भवनात आपल्याला बघायला मिळणार आहेत.
तालुकास्तरावर वीस टक्क्यांपेक्षा जास्त लोक संख्या असलेल्या आदिवासी भागात पाचशे आसन क्षमता असलेले सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतला असून या सांस्कृतिक भवनात कला महोत्सव, आदिवासी समाजाने उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री, त्यासाठी दुकाने बांधने, त्याच सांस्कृतिक भवनात विभागाचे कार्यालय आणि गेस्ट हाऊस बांधण्याचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आपल्या विभागाला दिल्या आहेत. तालुकास्तरावरील एक सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी सुमारे चार कोटी खर्च अपेक्षित आहे. या चालू अर्थसंकल्पीय वर्षातच या कामांना सुरुवात होणार असून यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतुद करण्यात येणार असल्याचे समजते.