रुग्णसंख्येत ३७.७९ टक्के घट तर साप्ताहिक मृत्यू दर ०.३४

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात कोरोना मरणपंथाला आला असल्याचे दोन आठवड्यातील अहवालातून समोर येत आहे. दोन्ही आठवड्याचा अहवाल सोमवारी आरोग्य विभागाने प्रसारीत केला. यात २१ ते २७ नोव्हेंबर तसेच २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर अशा दोन आठवडयांचा आढावा घेतला. यात सप्ताहातील दैनंदिन कोविड रुग्णांमध्ये ४७१ पासून २९३ पर्यंत म्हणजे ३७.७९ टक्के घट झाली असल्याचे सांगण्यात आले. तर या आठवडयात राज्यात कोविडमुळे झालेल्या मृत्यूची संख्या एक असल्याने साप्ताहिक मृत्यू दर ०.३४ इतका सांगण्यात आला.

या आठवडयात पॉझिटीव्हीटी दर ०.५५ टक्क्यांवरुन ०.४६ टक्क्यांवर आला आहे. मात्र, पुणे, कोल्हापूर, जालना, बुलढाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी एकपेक्षा अधिक आहे. तसेच रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्यांशिवाय आय सी यु मध्ये भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये नियमितपणे घट होताना दिसत आहे. या आठवडयात एकूण दैनंदिन रुग्णांच्या ३.४१ टक्के रुग्ण आय सी यु मध्ये भरती झाले. 

आतापर्यंत राज्यात मुंबई (७२), पुणे (७७) ठाणे (२६), नागपूर, कोल्हापूर प्रत्येकी तीन, भंडारा दोन, अकोला, अमरावती, रायगड  असे प्रत्येकी एक असे एकूण १८६ एक्स बी बी व्हेरियंट सापडले आहेत. एक्स बी बी व्हेरियंट वेगाने बी ए. २.७५ ची जागा घेताना दिसतो आहे. तथापि हा व्हेरियंट आढळलेल्या भागात कोविड प्रसाराचा वेग आणि रोगाची तीव्रता वाढलेली नसल्याची दिलासादायी बाब आहे.

राज्यात २२ नवीन रुग्णांची नोंद

सोमवारी राज्यात २२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,३५,९९९ झाली आहे. तसेच काल ३७ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८७,३१४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. 

राज्यात आज रोजी एकूण २७८ सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५६,९१,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३५,९९९ (०९.४९  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ३ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात तीन एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५४,०२१ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४४ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here