कोविडच्या साप्ताहिक अभ्यास अहवालातून समोर

@maharashtracity

मुंबई: राज्यातील कोविड (Covid-19) शेवटच्या घटका मोजत असल्याची दिलासादायी बाब दोन आठवड्याच्या अभ्यास अहवालातून समोर येत आहे. राज्यातील दैनंदिन कोविड रुग्णांमध्ये १६५९ पासून १०३७ पर्यंत म्हणजे ३७.४९ टक्के घट झाली असल्याचे साप्ताहिक अहवालातून समोर येत आहे.

दिनांक ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर तसेच ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या दोन सलग आठवडयांचा आढावा माहितीतून आरोग्य विभाग कोविड नियंत्रणात येत असल्याच्या निष्कर्षावर पोहचले आहे. दरम्यान, या आठवडयामध्ये राज्यात कोविड मृत्यूची संख्या सात असून मागील चार आठवडयापासून मृत्यू संख्या तेवढीच राहिली असल्याचे सांगण्यात आले. यातून साप्ताहिक मृत्यू दर हा ०.६७ टक्के एवढा आहे.

या आठवडयामध्ये प्रयोगशाळा चाचण्यांची पॉझिटीव्हीटी १.५७ टक्यांवरुन १.१५ टक्क्यांवर आलेली आहे. अकोला, वाशिम, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दोनपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. तसेच रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या तसेच आय सी यु मध्ये भरती होणाऱ्या गंभीर रुग्णांमध्ये नियमितपणे घट होत आहे. शिवाय या आठवडयात एकूण दैनंदिन रुग्णांच्या १.९९ टक्के रुग्ण आय सी यु (ICU) मध्ये भरती झालेले असल्याचे अहवालातून समोर आले.

नवीन बी. क्यू.१.१ नव्या व्हेरियंटचा रुग्ण :

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात २९ वर्षाच्या एका पुरुषामध्ये ओमायक्रॉन कुटुंबामधील बी. क्यू.१.१ हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. या रुग्णाचा आयर्लंड प्रवासाचा इतिहास असून त्याला सौम्य स्वरुपाचा आजार होता. तो घरगुती विलगीकरणात (home quarantine) बरा झाला. या प्रवाशाने कोविशिल्ड लसीचे (covishield vaccine) दोन्ही डोस घेतलेले आहेत. आतापर्यंत राज्यात मुंबई (७२), पुणे (२९) ठाणे (८), नागपूर, भंडारा प्रत्येकी २, अकोला, अमरावती, रायगड प्रत्येकी १ असे एकूण ११६ एक्स बी बी व्हेरियंट सापडले आहेत. मात्र, या भागात कोविड प्रसाराचा वेग आणि रोगाची तीव्रता वाढलेली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here