मुंबईत ३ तर राज्यात १७७ करोना मृत्यूंची नोंद
@maharashtracity
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एक अंकी मृत्यू काही ठराविक दिवसांनी नोंदविला जात आहे. मंगळवारी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने दिलासा मिळत आहे. मुंबईत आता पर्यंत १५९११ कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मुंबईत काल दिवसभरात २९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३५६५७ एवढी झाली असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यात मंगळवारी १७७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८५,३२,५२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात ६,००५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२१,०६८ झाली आहे. काल ६,७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७४,३१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.