बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी नियुक्ती न करण्याची मागणी
@maharashtracity
धुळे: बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी नियुक्ती करु नये, या उच्च न्यायालय व प्रधान सचिवांच्या आदेशाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) आयुक्तांनी केराची टोपली दाखविल्याने महाराष्ट्र राज्य पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेच्या कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात गौतम वाघोदे, शीतल शिंदे, दीपक भावसार, योगेश पानपाटील, भिमराव पाटील, सचीन वाघोदे, गोकूळ भामरे, विलास ठाकरे, चेतन चव्हाण आदी कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.
याबाबत कंत्राटी कर्मचार्यांनी (contract workers) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील जनतेला पाण्याची गुणवत्ता तपासणी करुन शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने सन 2012-13 मध्ये स्थापन झालेल्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा शासन व प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
या पाणी तपासणी प्रयोगशाळांमध्ये सन 2012-13 मध्ये कंत्राटी स्वरुपात कर्मचारी भरण्यात आले होते. परंतु, आता केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन राज्य शासनाने या कंत्राटी कर्मचार्यांच्या नियुक्त्या बाह्यस्त्रोत यंत्रणेकडून करण्याचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक, असे करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीदेखील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून विना मुदतवाढ आदेश व विना वेतन काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. शासन व प्रशासनाच्या आठमुठे धोरणामुळे पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा (water quality testing labs) बंद होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी नियुक्त्या करु नये, सहानभूतीपूर्वक आमचा विचार करावा, असे कंत्राटी कर्मचार्यांनी म्हटले आहे.