@maharashtracity
शिवसेना दुसऱ्या तर समाजवादी तिसऱ्या क्रमांकावर
प्रजा फाउंडेशनकडून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कामगिरीचा अहवाल
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना प्रजा फाउंडेशनने (Praja Foundation) मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा गुरुवारी ऑनलाइन जाहीर केला आहे.
महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता आहे. काँग्रेस (Congress) विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत असून सेनेचा यापूर्वीचा मित्रपक्ष भाजप (BJP) पक्ष पहारेकरीची भूमिका वठवत आहे. असे असताना, गेल्या २०१७ – २०२१ या कालावधीत सर्व पक्षीयांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी (५७.२१%) सर्वोत्तम ठरली आहे. त्यापाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेची दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी (५५.८८%) ठरली आहे. तर समाजवादी पक्षाची कामगिरी (५५.०५%) ठरली आहे. त्यामुळे काँग्रेसला या प्रगती अहवालाचा वापर पालिका निवडणुकीत करता येणार आहे.
तसेच, २०२०-२१ मध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांना श्रेणी -१ (गुण ८१.१२%) , शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांना श्रेणी – २, (गुण ८०.४२%), तर भाजपचे नगरसेवक हरीश छेडा यांना श्रेणी -३ ( गुण ७७.८१% ) मिळाली आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पिछाडीवर पडलेली दिसते.
प्रजा फाउंडेशनने, २०१७ ते २०२१ कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मुंबई महापालिकेतील २२७ नगरसेवकांपैकी केवळ १० टक्के म्हणजेच २२ नगरसेवकांचा ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरित नगरसेवकांना ‘क’, ‘ड’, ‘ई’, ‘फ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
एमआयएम नगरसेविका “मौनी”
प्रजा फाउंडेशनच्या या अहवालात, एमआयएम (MIM) पक्षाच्या एकमेव नगरसेविका गुलनाझ कुरेशी यांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित न केल्याने त्या ‘मौनी नगरसेवका’ ठरल्या आहेत.
त्याचप्रमाणे एप्रिल २०२० ते मार्च २०२१या कालावधीत ३०% नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही.
तसेच, २०१७ ते २०२१ या कालावधीत ५०% नगरसेवकांनी १७ प्रश्न उपस्थित केले आहेत.
तसेच, ९९.५५% नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारीबाबत प्रश्न विचारताना प्राधान्य दिले नसल्याचे मत प्रजाने नोंदविले आहे.
उपस्थिती
पालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीचा आढावा घेतल्यास, पालिकेत २०१२-१३ मध्ये नगरसेवकांची उपस्थिती ८१% , २०१४-१५ मध्ये ६९%, २०१७-१८ मध्ये ८२%, तर २०१९-२० मध्ये ७४% इतकी उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच एकाही वर्षात सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती ८३% वर गेलेली नाही.